देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एका हॉटेलला आज सकाळीच भीषण आग लागली. या आगीत जवळपास २१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये सर्वाधिक विदेशी पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत अनेक धक्कादायक बाब समोर येऊ लागल्या आहेत. हॉटेलमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी सोय (Ventilation) नव्हती, असा दावा हॉटेलमध्ये राहायला आलेल्या ग्राहकांनी केला. तर, या हॉटेलमध्ये फक्त ६ खोल्या चालवण्याचा परवाना होता, पंरतु येथे २५ खोल्या कार्यरत होत्या, असाही दावा केला जात आहे.

इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या इमारतीत आग लागली तिथे ‘फ्लरिश स्टे’नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलला दिल्ली सरकारच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ (B&B) योजनेअंतर्गत केवळ ६ खोल्या चालवण्याचा परवाना होता. मात्र, आग लागली तेव्हा तिथे नियमबाह्यपणे तब्बल २५ खोल्या चालवल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

बेड अँड ब्रेकफास्ट योजना काय?

या योजनेच्या नियमांनुसार, नोंदणीकृत आस्थापनांना जास्तीत जास्त ८ खोल्या आणि १६ खाटांचीच परवानगी असते. त्यामुळे या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असून प्रशासकीय देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. सुरुवातीला या हॉटेलचे नाव ‘लेमन ग्रीन इन’ (Lemon Green Inn) असल्याचे सांगितले जात होते. परंतु, दिल्ली सरकारने ही दुर्घटना हौझ राणी (Hauz Rani) भागातील ‘फ्लरिश स्टे’ हॉटेलमध्ये घडल्याची माहिती दिली.

बीएनबी सील करा, गृहमंत्र्यांचे आदेश

तर, बुधवारी सकाळी मालवीय नगरमधील एका बेड अँड ब्रेकफास्टमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी बांधकाम योजना आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व बीएनबींना सील करण्याचे निर्देश दिले आहेत. “अशा मालकांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस बजावण्याची किंवा स्पष्टीकरणासाठी वेळ देण्याची गरज नाही. फक्त सर्व बीएनबी सील करा,” असे सूद म्हणाले. असं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास या गजबजलेल्या भागात ही आग लागली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दल आणि बचाव पथकाने तत्परतेने मोठी मोहीम राबवून धुराचे साम्राज्य पसरलेल्या इमारतीमधून ३७ जणांना सुखरूप बाहेर काढले. आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धुरापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन महिलांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्याचे धक्कादायक दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दुर्घटनेतील अनेक जखमींना उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटल आणि एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, “मालवीय नगरमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. दिल्ली सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत आणि साहाय्य पुरवले जात आहे. या दुःखाच्या प्रसंगी दिल्ली सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी साहाय्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.