नवी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वच्छतागृह वापरण्यास नकार दिल्याचा एका महिलेचा दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेचा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करण्यात आला असून, त्यावर युजर्सच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
महिलेचा नेमका दावा काय?
व्हिडीओमध्ये महिला एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर उभी राहून आपली बाजू मांडताना दिसते. संबंधित हॉटेल शांग्री-ला एरोस असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. महिलेच्या दाव्यानुसार, तिला तातडीने स्वच्छतागृहा जाण्याची गरज असतानाही हॉटेलमध्ये त्याचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली नाही. महिलांनाही स्वच्छतागृह वापरू दिले जात नसल्याचे तिने म्हटले आहे.
१८६७ च्या कायद्याचा दाखला
या पोस्टमध्ये भारतीय सराय अधिनियम, १८६७ चाही उल्लेख करण्यात आला आहे. या कायद्यानुसार हॉटेलने प्रवाशांना अथवा सर्वसामान्यांना स्वच्छतागृह वापरू देणे बंधनकारक आहे का? असा प्रश्न याद्वारे उपस्थित करण्यात आला.
सोशल मीडियावर दोन गट
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर युजर्समध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काहींनी आपत्कालीन परिस्थितीत हॉटेलने माणुसकीच्या दृष्टीने स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी द्यायला हवी, असे म्हटले. तर, दुसरीकडे काही युजर्सनी हॉटेलची बाजू घेतली. पंचतारांकित हॉटेल ही खासगी मालमत्ता असल्याने कोणाला परिसरात प्रवेश द्यायचा आणि सुविधा वापरू द्यायची याचा अधिकार हॉटेलला असल्याचे त्यांनी म्हटले.
‘सार्वजनिक स्वच्छतागृह वापरा’, व्हिडीओवर टीका
काही युजर्सनी महिलेच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले. हॉटेलच्या लॉबीजवळ स्वच्छतागृह असतात आणि लॉबीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती वापरण्यापासून सामान्यतः रोखले जात नाही, असा दावा काहींनी केला. एका युजरने तर हा प्रकार केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा आरोप केला. तर काहींनी प्रश्न केला की, तातडीची गरज असल्यास जवळचे सार्वजनिक स्वच्छतागृह का वापरले नाही?
हॉटेलची बाजू अद्याप समोर आलेली नाही
व्हायरल व्हिडीओमध्ये केवळ संबंधित महिलेची बाजू दिसते. या दाव्यावर हॉटेल प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट होत नाही. त्यामुळे नेमके काय घडले, याबाबत स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.
