Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदी आतिशी मार्लेना लवकरच विराजमान होतील. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल आता पुढच्या १५ दिवसांमध्ये त्यांचे दिल्लीतील शासकीय निवासस्थान देखील सोडणार आहेत. यासंदर्भातील माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिली असल्याचं इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.

संजय सिंह यांनी काय म्हटलं?

“अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते १५ दिवसांमध्ये त्यांचं शासकीय निवासस्थान सोडणार आहेत. यानंतर ते दिल्लीतील सर्वसामान्य लोकांमध्ये राहतील. या बरोबरच केजरीवाल त्यांची सुरक्षा, गाडी, ड्रायव्हर आणि कर्मचारी यांसारख्या इतर सर्व सुविधांचा लाभ घेणार नाहीत. खरं तर कोणत्याही निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अनेक शासकीय सुविधा मिळत असतात. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांनी पहिली गोष्ट म्हणजे १५ दिवसांत शासकीय निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच त्यांना मिळणाऱ्या सर्व व्हीआयपी सुविधांचाही ते लाभ घेणार नाहीत”, अशी माहिती संजय सिंह यांनी दिली.

हेही वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी याआधीही मुदतीआधीच दिला होता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा; २०१३ साली काय घडलं होतं?

दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील शासकीय निवासस्थान रिकामे केल्यानंतर केजरीवाल आणि त्यांचे कुटुंबीय दुसरीकडे राहण्यासाठी कुठे जाणार? याबाबतची माहिती संजय सिंह यांनी सांगितली नाही. दरम्यान, केजरीवाल यांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना संजय सिंह यांनी आरोप केला की, “आम आदमी पक्षाच्या प्रमुखांना याआधी अनेक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकावले होते. आम्ही केजरीवाल यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांचे निवासस्थान त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. आता त्यांनी ठरवलं आहे की, ते नियमानुसार निवासस्थान सोडतील”, असं संजय सिंह यांनी सांगितलं.

सिंह पुढे म्हणाले, “देव त्यांच्या पाठीशी आहे. जवळपास सहा महिने केजरीवाल हे तुरुंगात गुन्हेगारांमध्ये राहिले. आताही देव त्यांचे संरक्षण करेन. ते आता सामान्य लोकांमध्ये राहणार आहेत. तसेच दिल्लीच्या जनतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकर प्रचंड बहुमताने प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील”, असंही संजय सिंह म्हणाले.