दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनयकुमार याला प्रथम वर्ष बीएची परीक्षा देता यावी यासाठी कारागृहाच्या संकुलात व्यवस्था करावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने गुरुवारी दिल्ली विद्यापीठ आणि तिहार कारागृहाचे संबंधित अधिकारी यांना दिला.
सदर परीक्षा देण्यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी विनयकुमार याने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मुक्त शिक्षण शाळा, दिल्ली विद्यापीठाचे संबंधित अधिकारी आणि तिहार कारागृहाचे अधीक्षक यांना नोटिसा जारी कराव्यात आणि विनयकुमार याची परीक्षेला बसण्याची व्यवस्था करण्याचा आदेश सुटीकालीन आणि अतिरिक्त सत्र न्या.नीलम सिंग यांनी दिला.
पतियाळा हाऊस न्यायालयाने बुधवारी विनयकुमार याची जामीन याचिका फेटाळली होती. सदर बाब आपल्या अधिकारकक्षेत येत नसल्याचे कारण देऊन पतियाळा न्यायालयाने साकेत येथील संबंधित न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते.
विनयकुमारला परीक्षा देण्यासाठी सोडण्यात येणार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागेल. कारण या प्रकरणाशी सामाजिक संवेदनक्षमतेचा संबंध असल्याने त्याच्यावर हल्ला होण्याचा धोका आहे. त्यामुळे आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही, असे सरकारी वकील राजीव मोहन म्हणाले.