दिल्लीत १० वर्षांच्या चिमुरडीने रेखाटलेल्या स्केचमुळे अत्याचार करणारा नराधम काका कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या या प्रकरणात सबळ पुरावा नव्हता. मात्र न्यायालयात चिमुरडीने कागदावर रेखाटलेल्या स्केचच्या आधारे न्यायाधीशांनी नराधम काकाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

कोलकात्यात जन्मलेली चिमुरडी आठ वर्षांची असताना दिल्लीत काकाच्या घरी आली होती. या दरम्यान काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून चिमुरडीने घरातून पळ काढला होता. याप्रकरणी काकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गेल्या वर्षी जूनमध्ये त्याला अटकही केली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणाची दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले होते. पोलिसांना काय सांगायचे हे तिला शिकवण्यात आले होते आणि हा पुरावा ठरु शकत नाही, असे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे होते. आता लहान मुलगी १० वर्षांची असून, सुनावणीदरम्यान तीदेखील न्यायालयात होती. तिने सुनावणीदरम्यान कागदावर एक चित्र रेखाटले. यात एका मुलीच्या हातात फुगे असून तिचा फ्रॉक बाजूला पडला आहे. बंद अवस्थेतीत घर तिने दाखवले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी चिमुरडीने रेखाटलेले स्केच हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला. या चित्रातून त्या चिमुरडीवर बेतलेल्या प्रसंगाची जाणीव होते. या खटल्यातील घटनाक्रम आणि पार्श्वभूमी बघता चित्रातून तिच्यावर कुटुंबातील व्यक्तीनेच अत्याचार केल्याचे समोर येते. त्यामुळे पीडित मुलीला साक्षीदार म्हणून ग्राह्य धरता येईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. न्यायालयाने नराधम काकाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

पीडित मुलीच्या वडीलांना दारुचे व्यसन असून, आईच्या निधनानंतर वडीलांनी मुलीला सोडून दिले होते. काकूने मुलीला दिल्लीत आणले पण तिथे तिला दुसऱ्या घरात काम करण्यास भाग पाडण्यात आले. यात भर म्हणजे तिच्या काकाने अत्याचारही केला. तिच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच लैंगिक अत्याचार केले याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

पीडित मुलगी ही एका बसमध्ये सापडली होती. वैद्यकीय चाचणीत तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शेवटी सामाजिक संघटनेच्या समुपदेशकांनी तिच्याशी संवाद साधला आणि तिला बोलते केले. मुलीने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी तिच्या काकाला अटक केली होती. पण अटकेनंतर काका अहमदने निर्दोष असल्याचा दावा केला होता.