दिल्लीत करोनाचं संकट आणखी गडद होत असल्याने आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालायवरील ताण कमी करण्यासाठी करोना साखळी तोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

दिल्ली सरकारने एका आठवड्याने लॉकडाऊन वाढवल्याने आता १० मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. मागील दोन आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याची मुदत सोमवारी सकाळी ५ वाजता संपणार होती. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने आणखी आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवलं आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

आठवडाभरच्या लॉकडाऊनमध्ये आतापर्यंतचे सर्व निर्बंध लागू असतील. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीत शुक्रवारी २७,०४७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी रूग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आजच्या आज ऑक्सिजन पुरवा”, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं!

दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा देखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे. “आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे”, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.