Delhi WFH Parking Fee Rules : दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक महत्त्वाचे उपाय जाहीर केले आहेत. नोव्हेंबरपासून दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंग शुल्क वाढवण्यापासून कार्यालयांमध्ये ५० टक्के घरून काम करण्यापर्यंत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. हे उपाय १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत.

पार्किंग शुल्क होणार दुप्पट

खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी दिल्लीतील अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी आकारले जाणारे शुल्क १ नोव्हेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. हा निर्णय २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहील. मात्र, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील पार्किंग सुविधांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

कार्यालयांच्या वेळेतही बदल

वाढत्या प्रदूषण काळात रस्त्यांवरील वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यानुसार दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी कार्यालये आता सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, तर दिल्ली सरकारच्या अंतर्गत कार्यालयांची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा अशी असेल. हे सुधारित वेळापत्रक आगामी १ नोव्हेंबरपासून ते २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे.

कार्यालयांमध्ये ५० टक्के ‘वर्क फ्रॉम होम’

प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, कार्यालयातील निम्मे कर्मचारी घरून काम करतील, तर उर्वरित ५० टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करतील. हा नियमही १ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे.

बांधकाम आणि पाडकामावर निर्बंध

धुळीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवरही कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. १० डिसेंबर २०२६ ते २० जानेवारी २०२७ या कालावधीत बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर पूर्ण बंदी असेल. याशिवाय, १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान धूळ निर्माण करणाऱ्या पाडकामाच्या तसेच बाहेरील नागरी बांधकामाच्या कामांवरही बंदी लागू करण्यात येणार आहे.

दिल्लीमध्ये हिवाळ्याच्या काळात प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याने सरकारने या उपाययोजना आधीच जाहीर केल्या आहेत.