हरियाणा आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन कुख्यात गुंडांचे एन्काउंटर केले. मारल्या गेलेल्या दोन्ही आरोपींवर हरियाणा पोलिसांकडून प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बहादूरगड परिसरात झालेल्या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पायालाही गोळी लागली असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुप्त माहितीवरून रचला सापळा

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे अधिकारी प्रमोद कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाला गुप्त सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती. जिम चालक कपिलच्या हत्येप्रकरणी फरार असलेले दोन मुख्य आरोपी हिसारचा हिसारचा रहिवासी प्रवेश आणि जाखोड खेडा गावचा हिमांशू हे दोघे सध्या हरियाणात फिरत आहेत आणि ते एखाद्या मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही गुंड लॉरेन्स बिश्नोई, हरीराम ऊर्फ हॅरी बॉक्सर आणि अनिल पंडित यांच्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेले होते.

शरण येण्यास नकार देत पोलिसांवरच केला गोळीबार

‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांचे काउंटर इंटेलिजन्स युनिट आणि हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त मोहीम आखली. पोलिसांनी बहादूरगड परिसरात या दोन्ही गुंडांना चहुबाजूंनी घेरले. हरियाणा एसटीएफचे पोलीस अधीक्षक विक्रांत भूषण यांनी सांगितले की, “पोलिसांनी दोन्ही आरोपींना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी शरण येण्याऐवजी थेट पोलीस पथकावरच अंदाधुंद गोळीबार सुरू केला.”

आत्मसंरक्षणासाठी पोलिसांचे प्रत्युत्तर

गुंडांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरा दाखल गोळ्या झाडल्या. दोन्ही बाजूंनी झालेल्या या जोरदार गोळीबारात प्रवेश आणि हिमांशू हे दोन्ही गुंड गंभीर जखमी झाले. तर दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचे कॉन्स्टेबल अंकित यांच्या पायाला गोळी लागल्याने तेही जखमी झाले.

चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही जखमी गुंडांना आणि पोलीस कॉन्स्टेबलला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी अंती दोन्ही गुंडांना मृत घोषित केले. सुदैवाने, जखमी पोलीस कॉन्स्टेबल अंकित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिवसाढवळ्या केलेल्या हत्येचा बदला?

हे दोन्ही आरोपी गेल्या ११ जून रोजी हांसी भागात झालेल्या जिम चालक कपिलच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी वॉन्टेड होते. ही संपूर्ण हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती, ज्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. या संपूर्ण एन्काउंटरप्रकरणी बहादूरगडच्या सदर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार या चकमकीची पुढील चौकशी केली जात आहे.