Raghav Chadha defamation case: आम आदमी पक्षातून भाजपात पक्षांतर केलेल्या राघव चड्ढा यांची बदनामी करणाऱ्या पाच सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रथमदर्शी या पोस्ट बदनामीकारक असल्याचे आढळून आल्याने त्या हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन झाले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांनी याबाबत निरीक्षण नोंदवले. “यात व्यक्तिमत्त्व हक्कांचा प्रश्न नाही, मी पाच पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहेत. बाकीच्या पोस्ट प्रथमदर्शनी बदनामीकारक नाहीत,” असे सुब्रमणियम प्रसाद म्हणाले. फोटो आणि व्यक्तिमत्त्वाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गैरवापर केला जात आसल्याचा आरोप करत भाजपा नेते, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. “पैशांसाठी स्वत:ला विकले”, अशा प्रकारचे नरेटीव्ह सोशल मीडियावरुन चालवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी व्यक्तिमत्त्व हक्कांच्या अंतर्गत सुरक्षेची मागणी केली होती.

व्यक्तिमत्त्व हक्कांचा भंग नाही – न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करताना याप्रकरणात व्यक्तिमत्त्व हक्कांचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाने पाच पोस्ट हटवण्याचे आदेश देत राघव चड्ढा यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. २७ मे रोजी उच्च न्यायालयाने चड्ढा यांना याप्रकरणात दिलासा मिळाला नव्हता. सुनावणीवेळी न्यायमूर्ती प्रसाद यांनी, “राजकीय नेत्यांना टीका, व्यंग आवडत नाही म्हणून त्यावर मर्यादा आणता येत नाही”, असे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने यावेळी व्यक्तिमत्त्व हक्कांचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट केले.

एआय, दिशाभूल करणाऱ्या कंटेटवर चड्ढांचा आक्षेप

राजकीय परिस्थितीवर टीका केल्याचेही न्यायालायने यावेळी नमूद केले. काही मीडिया पोस्टमध्ये साडी घातलेल्या वेशात फोटो दाखवण्यात आला असून, नरेंद्र मोदी पैशांचा वर्षाव करत असल्याचे दाखवले जात आहे, यावर देखील चड्ढा यांनी आक्षेप घेतला. चड्ढा यांनी एआयद्वारे तयार करण्यात येणारे व्हिडीओ, मॉर्फ फोटो-व्हिडीओ, बनावट भाषणं आणि दिशाभूल करणाऱ्या डिजिटल कंटेटच्या प्रसाराला मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. दरम्यान, राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षातून सात इतर खासदारांसह भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.