Delhi HC refuses relief Cockroach Janata Party X account: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना ‘एक्स’ खाते ब्लॉक प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने एक्स खाते तात्काळ सुरु करण्यास शुक्रवारी नकार दिला. काॅक्रोच पार्टीचे ‘एक्स’ खाते ब्लॉक केल्यानंतर दीपके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. “याप्रकरणी पुनर्विलोकन समिती सर्व पैलूंची तपासणी करेल”, असे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर म्हणाल्या. दरम्यान, न्यायालयाने या सुनावाईला दीपके यांना आभासी पद्धतीने हजर राहण्याची परवानगी दिली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव केले एक्स खाते बंद

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून अभिजीत दीपके यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ सुरु केली. अवघ्या ४-५ दिवसांत या डिजिटल चळवळीला भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्रावर विक्रमी फॉलोअर्स पार्टीच्या हँडल्सला फॉलो करु लागले. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार २१ मे रोजी भारतात कॉक्रोच पार्टीच्या ‘एक्स’ हँडलवर बंदी घालण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरोकडून माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत पार्टीच्या एक्स खात्यावर कारवाई करण्यात आली.

खाते तात्काळ पूर्ववत करण्यास नकार

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९(अ) अंतर्गत ‘X’ ला खाते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, हे खाते भारताबाहेरील देशांमध्ये अजूनही वापरता येते, अशी माहिती आहे. दरम्यान, न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार यांनी पार्टीचे खाते तात्काळ पूर्ववत करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचे दूरगामी परिणाम असल्याने, सरकारची बाजू ऐकल्याशिवाय असा दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालय काय म्हणाले?

“तुमच्या युक्तिवादांमध्ये तथ्य असू शकते, परंतु या सर्वांचा विचार होणे आवश्यक आहे. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याचा सर्वसमावेशक विचार केला जाईल. या प्रकरणाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम आहेत, ” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. केंद्र सरकारने सविस्तर उत्तर दाखल केल्यानंतर एक्स खात्यावरील बंदी उठवण्याचा विचार केला जाईल. आजपासून चार आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करावे, असे आदेश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.