Delhi Terror Alert and Security Updates : दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील आणि गर्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला असून दिल्ली पोलिसांनी संवेदनशील आणि गर्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या सतर्कतेनंतर शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी सखोल तपासणी मोहीम राबवण्यात आली. दिल्ली भाजपा प्रदेश कार्यालय आणि भाजपा राष्ट्रीय मुख्यालयाबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलिसांनी तपासणी करून अतिरिक्त बॅरिकेड्स लावले आहेत.
टार्गेट किलिंगची योजना?
महत्त्वाच्या ठिकाणांवर तैनात असलेले सुरक्षा दल देखील संभाव्य लक्ष्य असू शकतात असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने पाकिस्तानी गँगस्टर-दहशतवादी शहजाद भट्टीशी संबंधित मॉड्यूलचा नुकताच पर्दाफाश केला आहे, त्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भट्टी हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) च्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान, या मॉड्यूलचे सदस्य दिल्लीत ‘टार्गेट किलिंग’ (निवडक हत्या) करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील एका प्रमुख मंदिरासह काही हाय-प्रोफाइल ठिकाणांची रेकी करण्यात आली होती आणि त्याचे व्हिडिओ हँडलर्सना पाठवण्यात आले होते. या मॉड्यूलने मंदिरात तैनात पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना लक्ष्य करून गोळीबार करण्याचा कट रचला होता, यामुळे घबराट आणि गोंधळ निर्माण होईल.
हिसारमधील लष्करी कॅम्पचे फोटो सीमापार पाठवले
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना दिल्ली-सोनिपत महामार्गावरील एका लोकप्रिय ढाब्यावर ग्रेनेड हल्ला करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, इथं दररोज मोठी गर्दी असते. “हिसारमधील एका लष्करी कॅम्पचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचे व्हिडिओ सीमापार पाठवण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील काही पोलीस ठाणी देखील त्यांच्या निशाण्यावर होती”, असे वृत्त पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने दिले आहे.
गेल्या वर्षी, लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटानंतर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ‘व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल’चा पर्दाफाश केला होता. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या त्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या तपासात हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील अल फलाह विद्यापीठातील कट्टरपंथी डॉक्टरांचा समावेश असलेले दहशतवादी जाळे समोर आले होते. आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर उन नबी याच्याशी संबंध असल्याच्या किंवा त्याला मदत केल्याच्या आरोपावरून अनेक वरिष्ठ डॉक्टर, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
