सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यासंबंधीचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आता दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने असेही निर्देश दिले आहेत की डॉक्टरांचं एक पॅनल तयार केलं जावं आणि त्या पॅनलने सोनम वांगचुक यांच्यावर उपचार करावेत. मेदांता रुग्णालयाला सगळे सोनम वांगचुक यांचे सगळे वैद्यकीय अहवाल दिले जावेत असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि जस्टिस तेजस कारिया यांच्या पीठाने या प्रकरणावर सुनावणी केली.
दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
दिल्ली उच्च न्यायालयाने ही बाबही स्पष्ट केली की यासंबंधीचा विस्तृत आदेश नंतर दिला जाईल. सुनावणी सुरु असताना सरकार पक्ष आणि सोनम वांगचुक यांच्या बाजूचे वकील या दोन्ही वकिलांची चर्चाही झाली. सोनम वांगचुक यांना कुठे ठेवलं जावं याबाबत ही चर्चा करण्यात आली. सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी उच्च न्यायालयाला हे सांगितलं की सोनम वागणूक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करायचं असेल तर आमची काहीही हरकत नाही. आमची फक्त एकच अट आहे की डॉक्टरांच्या सल्याशिवाय सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज देऊ नका. सोनम वांगचुक यांच्या आसपास वावरणारे लोक त्यांना डिस्चार्ज मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही ही अट ठेवतो आहोत. तसंच सोनम वांगचुक यांना मेदांताच नाही तर दुसऱ्या रुग्णालयात जायचं असेल तर ते तिथेही जाऊ शकतात असंही सॉलिसिटर जनरल यांनी म्हटलं आहे.
२८ जूनपासून सोनम वांगचुक यांचं उपोषण
सोनम वांगचुक यांनी सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. सोनम वांगचुक यांना शनिवारी जेव्हा आंदोलन स्थळावरुन नेण्यात आलं तेव्हापासून त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी म्हणजेच १८ जुलैला सोनम वांगचुक यांच्या पत्नीने म्हणजेच गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं जावं ही मागणी केली होती. त्यांची ही याचिका शनिवारी फेटाळण्यात आली होती.आता आज दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात यावं असे आदेश दिले आहेत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २३ वा दिवस आहे. त्यांनी दोन मागण्या सरकारकडे केल्या आहेत. त्या झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं आहे.
