वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या नोंदीतील संपादनांची माहिती रोखल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी विकिपीडिया या लोकप्रिय संकेतस्थळाला न्यायालयाचा अवमान नोटीस बजावली. भारतीय कायद्याचे पालन करा. तुम्हाला जर भारत आवडत नसेल, तर भारतात काम करू नका. आम्ही केंद्र सरकारला तुमचे संकेतस्थळ बंद करायला सांगू,’’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने विकिपीडियाला सुनावले. वृत्तसंस्थेची माहिती असलेल्या पृष्ठावर काही संपादने करण्यास परवानगी दिल्याबद्दल ‘एएनआय’ने विकिपीडियावर बदनामीचा दावा करून दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. कथित संपादनात ‘एएनआय’ला भारत सरकारचे ‘प्रचार साधन’ म्हणून संबोधले गेले. न्यायालयाने विकिपीडियाला संपादने करणाऱ्या तीन खात्यांबद्दल तपशील उघड करण्याचे आदेश दिले होते, परंतु एएनआयने आज दावा केला आहे की हे उघड झाले नाही. त्यानंतर न्यायालयाने विकिपीडियाची कानउघाडणी केली.