Sameer Wankhede Defamation Plea : भारतीय महसूल सेवा विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुखानच्या प्रोडक्शन हाऊस आणि सिरीजविरोधात केलेल्या मानहानी खटल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खानच्या प्रोडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सविरोधात मानहानाची याचिका केली होती. द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधील भूमिकेवरून ही याचिका करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

समीर वानखेडे यांनी द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधील काही दृष्यांना स्थगिती देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. कारण, या वेबसीरिजमधून वानखेडे यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अशाप्रकारे बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी निर्मात्यांवर २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत असताना समीर वानखेडे यांनी २०२१ मध्ये मुंबईतील क्रूझ ड्रग्स छाप्याचे नेतृत्व केले होते. यात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. कालांतराने वानखेडे यांना या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय?

वानखेडे यांनी द बॅड्स ऑफ बॉलिवूड या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्यासारखे दिसणारे एक पात्र दाखवण्यात आले आहे. या सीरिजमधून सार्वजनिक प्रतिष्ठा मलिन करण्यात आल्याचा आरोप वानखेडे यांनी केला. त्याने शाहरूख खान आणि गौरी खान यांच्यासह मालकीच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि नेटफ्लिक्सकडून २ कोटी रुपयांची भरपाई मागितली. तसंच, या सीरिजमधील आक्षेपार्ह चित्रण काढण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली.

द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. यात बॉबी देओल, लक्ष्य, सहेर बंबा, मनोज पाहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंग, विजयंत कोहली, रजत बेदी आणि गौतमी कपूर असे कलाकार आहेत.