Delhi High Court Ruling Women Gang Rape : सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात महिलेवरही कारवाई होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. सामूहिक बलात्कार करण्याच्या समान हेतूने एखादी व्यक्ती गटाचा भाग म्हणून सहभागी झाली असेल, तर तिचे लिंग काहीही असले तरी तिला या गुन्ह्यासाठी जबाबदार धरता येऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती ए. जे. भंभानी यांनी १५ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

‘व्यक्ती’ या शब्दाचा अर्थ लिंगनिरपेक्ष

भारतीय न्याय संहिता कलम ७० आणि भारतीय दंड संहिता कलम ३७६D या दोन्ही तरतुदी सामूहिक बलात्काराशी संबंधित आहेत. या कलमांमध्ये ‘गट तयार करणाऱ्या एक किंवा अधिक व्यक्ती’ आणि ‘समान हेतूने कृती करणाऱ्या व्यक्ती’ असा उल्लेख आहे. या तरतुदींमधील ‘व्यक्ती’ हा शब्द केवळ पुरुषांसाठी मर्यादित मानण्याचे कोणतेही कारण नाही, असे न्यायालयाने नमूद केले. एखाद्या व्यक्तीने स्वतः बलात्कार केला नसला, तरी ती सामूहिक गुन्ह्यात समान हेतूने सहभागी असेल, तर कायद्यानुसार तिला त्या गुन्ह्यासाठी जबाबदार धरता येऊ शकते. मात्र, एखादी महिला एकटीच असेल आणि तिच्याबरोबर सामूहिक गुन्ह्यात सहभागी होणारा गट नसेल, तर तिला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अल्पवयीन मुलीच्या आईवर गंभीर आरोप

या प्रकरणातील आरोपी महिला ही कथित पीडित अल्पवयीन मुलीची आई आहे. आरोपानुसार, सहआरोपीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, महिलेने मुलीला सहआरोपीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि कथित अत्याचार सुरू असताना ती खोलीत उपस्थित होती, असे मुलीने आपल्या जबाबात म्हटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात संबंधित महिला आणि सहआरोपीने भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अंतर्गत आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आरोप निश्चित करण्याचा आदेश कायम ठेवला.

बलात्काराच्या व्याख्येतील बदलाचाही उल्लेख

न्यायालयाने बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येतील बदलांचा संदर्भ दिला. २०१३ पूर्वी भारतीय दंड संहितेतील कलम ३७५ अंतर्गत बलात्काराची व्याख्या प्रामुख्याने पुरुषाकडून स्त्रीवर होणाऱ्या लिंग-योनी प्रवेशापुरती मर्यादित होती. मात्र, २०१३ मधील दुरुस्तीनंतर या व्याख्येचा विस्तार करण्यात आला. सध्याच्या तरतुदींनुसार, योनी मार्गाव्यतिरिक्त शरीराचा अन्य भाग किंवा वस्तूचा प्रवेश, शरीराच्या विशिष्ट भागांशी संबंधित कृती आणि तोंडाचा योनी, गुदद्वार किंवा मूत्रमार्गाशी संपर्क यांसारख्या सर्व कृतींचाही कायद्यानुसार बलात्काराच्या व्याख्येत समावेश होतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कायद्यातील व्यापक प्रश्न खुला

महिलेला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी करता येत नाही, असा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायप्रक्रियेत कायद्यातील ‘व्यक्ती’ या शब्दाचा लिंगनिरपेक्ष अर्थ लावत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मात्र, याच वेळी बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येतील ‘पुरुष’ या शब्दाचा लिंगनिरपेक्ष अर्थ लावता येईल का, यावर भविष्यासाठी एक व्यापक कायदेशीर प्रश्न न्यायालयाने खुला ठेवला आहे.

या निर्णयामुळे सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात समान हेतूने सहभागी असलेल्या व्यक्तीची जबाबदारी ठरवताना केवळ तिच्या लिंगाच्या आधारावर सूट देता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.