BharatPe चे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांचे कंपनीशी चालू असलेले वाद गेल्या काही दिवसांपासून उद्योग जगतात चर्चेचा विषय ठरले आहेत. दोन्ही बाजूंनी ट्विटरवर एकमेकांवर टीका करताना वापरली जाणारी भाषा हाही वादाचा मुद्दा ठरला होता. थेट दिल्ली उच्च न्यायालयाने यासाठी दोन्ही बाजूंचे कान टोचले होते. भाषा जपून वापरण्याचा सल्लावजा इशाराही दिला होता. आता यासंदर्भातल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अशनीर ग्रोव्हर यांना मोठा दणका दिला आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दिल्ली पोलिसांत दाखल FIR रद्द करण्याची मागणी करणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
नेमका वाद काय?
अशनीर ग्रोव्हर यांनी कंपनीचे व्यवस्थापकी संचालक असताना त्यांच्या हितसंबंधांना पोषक ठरतील असे निर्णय घेतल्याचा आरोप भापतपे कडून त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याशिवाय, अशनीर ग्रोव्हर यांनी वैयक्तिक बेहिशेबी मालमत्ता जमवली असून त्यामुळे कंपनीला तब्बल ८० कोटींचं नुकसान झालं अशी तक्रार कंपनीकडून दिल्ली पोलिसांत दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अशनीर ग्रोव्हर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा दाखल गुन्हा रद्द ठरवण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी न्यायालयात केली होती.




पती-पत्नी दोघांविरोधात गुन्हा दाखल
अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात अशनीर ग्रोव्हर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशनीर ग्रोव्हर यांना न्यायालयाने सुनावलं
दरम्यान, याचिका फेटाळतानाच न्यायालयाने अशनीर ग्रोव्हर यांना सुनावलं आहे. “आत्तापर्यंत झालेला तपास किंवा सुनावणीमध्ये तुमच्याविरोधात हेतुपुरस्सर हे सगळं केलं जात असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. किमान आत्तापर्यंत तरी”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
“तुम्ही गटारातच राहा”
काही दिवसांपूर्वी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत यासंदर्भात सुनावणी चालू असताना न्यायालयाने अशनीर ग्रोव्हर आणि BharatPe कंपनीकडून एकमेकांवर टीका करण्यासाठी ट्विटरवर वापरल्या जाणाऱ्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला होता. “न्यायालयाची दोन्ही बाजूच्या सन्माननीय वकिलांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या अशीलांना समज द्यावी. त्यांच्या अशीरांनी एकमेकांविरोधात असंसदीय भाषेत टीका-टिप्पणी टाळावी. ही काही रस्त्यावरची भांडणं नाहीयेत. तुम्ही जर गटारात राहायचं ठरवलंच असेल, तर मग कृपया गटारात राहा”, अशा शब्दांत न्यायालयाने दोन्ही बाजूंना फटकारलं होतं.