Saurabh Bhardwaj : दिल्लीच्या जनकपुरीत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका ३० वर्षाच्या तरुणाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. दिल्लीच्या जल बोर्ड विभागाने एक खड्डा खोदला होता आणि त्याच खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्ली प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

याच मुद्यांवरून आता दिल्लीत चांगलंच राजकारण तापल्याचं दिसत आहे. आज आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज हे पीडित तरुणाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, तेव्हा पोलिसांनी सौरभ भारद्वाज यांना रोखल्याने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाजी झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सौरभ भारद्वाज यांना ताब्यात घेतलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून दिल्ली सरकारवर जोरदार टीका केली. सौरभ भारद्वाज म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्थेकडे कोणीही लक्ष देत नाही. जे आवाज उठवत आहेत त्यांना अशा पद्धतीने गप्प केलं जात आहे. मात्र, आम्ही जनतेचा आवाज उठवत राहू”, असं ते म्हणाले.

दरम्यान, याआधीही सौरभ भारद्वाज यांनी जनकपुरीतील घटनेवरून दिल्ली पोलीस आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली होती. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष आणि महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवण्यात आल्याचा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला होता.

सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की, अपघाताच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत तरुणाचे कुटुंब त्यांच्या मुलाच्या शोधात पोलीस ठाण्यात पोहोचलं होतं. मात्र, सहा पोलीस ठाण्यात जाऊनही त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही. मोबाईल फोनच्या स्थानाशी संबंधित महत्त्वाची माहिती घाईघाईने हटवण्यात आल्याचा आरोपही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

दिल्लीत नेमकं घटना काय घडली?

दिल्लीत एका ३० वर्षाच्या तरुणाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या जल बोर्ड विभागाने हा खड्डा खोदला होता अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे दिल्ली प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत उप कंत्राटदाराला अटक केलं. तसेच उप कंत्राटदार आणि दिल्ली जल मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आता पुढील कारवाई सुरू आहे.