Delhi Honey Trap case update: Gang using dating apps to rob citizens busted by police: सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ टोळीचा दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नेहरू प्लेस येथून एका ३४ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून, त्याला मारहाण करत ७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी हरलीन कौर उर्फ जेनी (२०) आणि तिच्या चार पुरुष साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
असा रचला सापळा
पोलीस उपआयुक्त (दक्षिण-पूर्व) हेमंत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरलीन कौरने एका डेटिंग ॲपद्वारे पीडित व्यक्तीशी मैत्री केली होती. मंगळवारी संध्याकाळी तिने त्याला नेहरू प्लेस येथे ‘डेट’साठी बोलावले. पीडित तरुण तिथे पोहोचताच, हरलीनचे साथीदार दोन गाड्यांमधून तिथे आले. त्यांनी तरुणाला जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि त्याचे अपहरण केले.
रात्रभर ओलीस ठेवून ७ लाखांची लूट
तक्रारीनुसार, आरोपींनी तरुणाचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन UPI, ATM आणि क्रेडिट कार्डद्वारे सुमारे ७ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आरोपींनी त्याला रात्रभर दक्षिण दिल्ली आणि गुरुग्रामच्या रस्त्यांवर गाडीतून फिरवले आणि बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पुन्हा नेहरू प्लेस येथे सोडून दिले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे-
- हरलीन कौर उर्फ जेनी (२०): टोळीची मुख्य सूत्रधार.
- नबजोत (३०): जिम आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षक.
- संजय उर्फ जॉय (२८): पशुवैद्यकीय शाखेचा (Veterinary) विद्यार्थी.
- ऋषभ (२५): कॅब चालक.
- साहिल चौहान: साथीदार.
डॉक्टरांनाही बनवले होते लक्ष्य
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या टोळीने याच पद्धतीने एका डॉक्टरसह आणखी दोन जणांना लुटले होते. हरलीन डेटिंग ॲपवरून तरुणांना आमिष दाखवून एकांतात भेटायला बोलावायची आणि त्यानंतर तिचे साथीदार तिथे येऊन दरोडा टाकत असत. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (दरोडा) आणि १४० (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
