दिल्लीत राहणाऱ्या १८ वर्षीय गर्भवती तरुणीची कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने तिच्या ५२ वर्षीय वडिलांनी एका नातेवाईकाच्या मदतीने तिला आग्र्यातील चंबळ नदीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
औषधोपचाराच्या बहाण्याने आग्र्याला नेले
दक्षिण दिल्लीतील रहिवासी असलेली ही १८ वर्षीय तरुणी सुमारे तीन महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी पीसीआरवर एका महिलेची तिच्या वडिलांनी हत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने २८ जुलै रोजी मुलीला उपचारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने जावयासह आग्र्याला नेल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या रात्री त्यांनी एका नातेवाईकाच्या घरी मुक्काम केला.
चंबळ नदीत ढकलल्याचा आरोप
दुसऱ्या दिवशी आरोपी मुलीला चंबळ नदीच्या काठावर घेऊन गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी तिला नदीत उडी मारण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर दोघांनी मिळून तिला नदीत ढकलल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघेही दिल्लीला परतले. तपासादरम्यान मोबाईल लोकेशनच्या आधारे तरुणी आणि दोन्ही आरोपी एकाच वेळी आग्र्यात गेल्याची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलीचे पाय स्पर्श करून ढकलल्याचा धक्कादायक दावा
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी मुलीला नदीत ढकलण्यापूर्वी तिच्या पायांना स्पर्श केला होता. या दाव्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
दोघांना अटक; मृतदेहाचा शोध सुरू
दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त अनंत मित्तल यांनी सांगितले की, आपली मुलगी विवाहाबाहेर गर्भवती असल्याच्या आरोपावरून सामाजिक बदनामीच्या भीतीने, आरोपी वडिलांनी आपल्या नातेवाईकासोबत कट रचला आणि तिला आग्र्याजवळील बसोनी येथे चंबळ नदीच्या काठावर नेऊन पाण्यात बुडवून तिची हत्या केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तासेच चंबळ नदीत बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेण्यासाठी गोताखोर आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.
