Delhi Hospital Doctor Found Dead : दिल्लीतील अरुणा असफ अली रुग्णालयात रविवारी सकाळी एका ३५ वर्षीय वरिष्ठ निवासी डॉक्टरचा ड्युटी रूममध्ये मृतदेह आढळला. प्राथमिक तपासातून त्यांनी आत्महत्या केली असून तीन पानांची चिठ्ठी जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलैच्या सकाळी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एका पीसीआर (PCR) कॉलद्वारे याची माहिती मिळाली. अधिकारी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की, भूलशास्त्र (ॲनेस्थेशिया) विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर सिमरप्रीत सिंग आनंद हे ड्युटी रूम नंबर १०९ मध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असलेले डॉ. आनंद गेल्या तीन वर्षांपासून या रुग्णालयाच्या भूलशास्त्र विभागात कार्यरत होते.

४ जुलै रोजी रात्री ८ वाजेपासून ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ते रात्रीच्या ड्युटीवर होते. पोलिसांनी सांगितलं की, ड्युटी रूम आतून कुलूपबंद होती. शंका आल्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास दरवाजा तोडण्यात आला. डॉ. आनंद यांना तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तपासकर्त्यांना त्यांच्या डाव्या हातात कॅन्युला घातलेला आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास डॉक्टरांच्याच सांगण्यावरून एका टेक्निशियनने हा कॅन्युला लावला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

जिल्हा गुन्हे शाखा आणि रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने ड्युटी रूमची पाहणी केली. पोलिसांनी खोलीतील एका काळ्या रंगाच्या बॅगमधून सिरिंज, औषधांच्या रिकाम्या कुपी, तीन पानांची चिठ्ठी आणि डायरी जप्त केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शवागारात पाठवण्यात आला आहे. सोमवार रोजी वैद्यकीय मंडळाकडून (मेडिकल बोर्ड) हे शवविच्छेदन केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

तपास सुरू

खोलीतून जप्त केलेल्या चिठ्ठीत डॉक्टरांनी स्वतः हे पाऊल उचलल्याचं नमूद केलं आहे, असं पोलिसांनी सांगितले. यामध्ये रुग्णालयाच्या भूलशास्त्र विभागातच गेल्या दोन वर्षांपासून वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या सहकारी डॉ. आकांक्षा चौधरी यांच्यासोबतच्या संबंधांचाही उल्लेख आहे. चिठ्ठीनुसार, दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिली नव्हती. डॉ. चौधरी या मध्य प्रदेशातील जबलपूरच्या रहिवासी आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिस या मृत्यूमागील कारणांचा अधिक तपास करत आहेत.