दिल्लीत सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एका खासगी वसतिगृहाची पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातली ही पाचवी अटक आहे.
शुभम त्यागी फरार, सुधांशूला अटक
पोलिसांनी सांगितलं की आम्ही सुधांशू नावाच्या माणसाला अटक केली आहे. सत्य निकेतन या ठिकाणी पेईंग गेस्ट ऑपरेटर म्हणून हा काम करत होता. त्याला आम्ही आज अटक केली आहे. सत्य निकेतन ही इमारत कोसळून रविवारी सात जणांचा मृत्यू झाला. सत्य निकेतन या इमारतीचा वापर खासगी वसतिगृह म्हणून केला जात होता. धौला कुआँ परिसरात असलेल्या श्री वेंकटेश्वरा महाविद्यालयाच्या समोरच ही इमारत होती. जी कोसळल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम त्यागी आणि सुधांशू हे लीजवर हॉस्टेल घेऊन हॉस्टेल डेझ नावानाने पीजी चालवत होते. २०२५ पासून शुभम आणि सुधांशू हे पार्टनर होते. या प्रकरणात आरोपीला शुभम त्यागी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला थरार
इमारत कोसळताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अवघ्या काही सेकंदात पूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. इमारतीचा मोठा भाग कोसळून ढिगारा सर्वत्र पसरला. काँक्रीट आणि इतर साहित्य अचानक खाली आल्यामुळे इमारतीत आणि आसपास असलेल्या लोकांना धावण्याची संधीच मिळाली नाही.
सत्य निकेतन इमारतीजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे ढिगाऱ्यामुळे मोठे नुकसान झालं. ढिगाऱ्याखाली लोक अडकल्यामुळे बचाव पथक अत्यंत खबरदारीने बचाव मोहीम राबवत आहेत. इमारत कोसळण्याच्या कारणांचा तपास सुरू असून, इमारतीमध्ये सुरू असलेले नूतनीकरणाचे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तळघरात खोदकाम सुरू असल्याचा संशय असून, त्यामुळेच इमारतीचा पाया कमकुवत झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला होता. या घटनेची चौकशी केली जाते आहे.
दिल्ली महापालिकेचे पाच अधिकारी निलंबित
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दुर्घटनेनंतर घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, २९० आणि १२५(अ) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, दिल्ली महानगर पालिकेने याप्रकरणी कारवाई करताना पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
