Delhi Hotel Fire Gurugram CA Family Death: दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील एका हॉटेलला बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ८ जणांसह तब्बल २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये गुरुग्राममधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (CA) विवेक अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. दिल्लीतील ‘मॅक्स हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी विवेक अग्रवाल संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत आले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण गुरुग्राम आणि मालवीय नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
उपचारादरम्यान वडिलांना भेटायला आले अन् …
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या सेक्टर ४६ मध्ये राहणारे सीए विवेक अग्रवाल यांचे ८० वर्षीय वडील राधे श्याम अग्रवाल यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची विचारपूस करण्यासाठी विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी अग्रवाल, दोन मुलींसह इतर चार नातेवाईकांना घेऊन दिल्लीला आले होते. त्यांनी मालवीय नगरमधील ‘फ्लरिश स्टे’ या बेड-अँड-ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या.
बुधवारी सकाळी हे सर्वजण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते, त्याच वेळी अचानक हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत विवेक यांच्यासह कुटुंबातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता या कुटुंबात केवळ त्यांचे ८० वर्षांचे वृद्ध वडीलच जिवंत आहेत.
डीएनए चाचणीनंतरच मृतदेह ताब्यात मिळणार
या भीषण अपघाताची माहिती मिळताच अग्रवाल यांच्या इतर नातेवाईकांनी दिल्लीतील रुग्णालयात धाव घेतली. मात्र, आग अत्यंत भीषण असल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डीएनए नमुने गोळा केल्यानंतर आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील. दुसरीकडे, गुरुग्राममधील विवेक अग्रवाल यांच्या घराजवळ शांतता पसरली असून, संपूर्ण परिसर या दुःखात बुडाला आहे.
अरुंद इमारत, बंद खिडक्या…निष्पापांचा गुदमरून मृत्यू
बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या पाच मजली अरुंद इमारतीला आग लागली आणि ती वेगाने पसरली. या दुर्घटनेत एकूण २१ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये १२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये सुमारे ४० ग्राहक होते, ज्यातील बहुतांश जण झोपेत होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीला येण्या-जाण्यासाठी फक्त एकच दरवाजा होता. हॉटेलच्या खिडक्या कायमच्या बंद (सील) करण्यात आल्या होत्या, तर मुख्य दरवाजा सेन्सरवर चालणारा होता. आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि सेन्सर दरवाजा बंद झाला. खिडक्याही उघडता येत नसल्याने ग्राहकांना बाहेर पडायला कोणतीही जागा उरली नाही.
नियम धाब्यावर बसवून हॉटेलचा व्यवसाय?
दिल्ली सरकारच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेअंतर्गत या हॉटेलला केवळ ६ खोल्या चालवण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करून या इमारतीत बेसमेंटसह तब्बल २५ खोल्या बेकायदेशीरपणे चालवल्या जात होत्या. या निष्काळजीपणामुळेच २१ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
