दिल्लीतल्या मालवीय नगर भागात असलेल्या एका रेस्तराँला आग लागली. या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जण होरपळून जखमी झाले. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यात बहुतांश विदेशी नागरिक आहेत. रेस्तराँच्या शेफने काय घडलं ते आता सांगितलं आहे.

मालवीय नगरमधली घटना नेमकी काय?

दिल्लीतलं मालवीय नगर हा उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या रेस्तराँला आग लागली. त्यामुळे रेस्तराँ मध्ये तर हलकल्लोळ उडालाच पण या घटनेत हॉटेलमध्ये थांबलेल्या २१ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले, भाजले. अग्निशमन दलाने इथे पोहचून मदत आणि बचावकार्य सुरु केलं. मालवीय नगरमधील रेस्तराँला अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सर्वत्र धावाधाव सुरु केली. मिळेल त्या मार्गाने अडकून पडलेले नागरिक मार्ग काढत होते. वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाद्यांवर उड्या घेतल्या. दक्षिण दिल्लीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनंत मित्तल यांनी या घटनेबाबत एएनआयला माहिती दिली. “सकाळी आठ वाजून ४८ मिनिटांनी मालवीय नगरमधील फ्लोरिश स्टे बी&बी रेस्तराँला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.”

शेफ केसर नेगी यांनी काय सांगितलं?

आमचं रेस्तराँ ग्राऊंड फ्लोअरला आहे. मी शेफ म्हणून काम करतो. केसर नेगी यांनी सांगितलं की रेस्तराँ मध्ये इलेक्ट्रिक गॅस होता. (इंडक्शन) तो सुरु केला आणि स्फोट झाला. त्यानंतर थेट आग लागली. आगीचे लोळ वाढत गेले आणि आग पसरत गेली, असं केसर नेगी यांनी सांगितलं. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. केसर नेगी यांनी हे सांगितलं आहे पण अद्याप पोलीस किंवा अग्निशमन दलाने आग लागण्याचं कारण स्पष्ट सांगितलेलं नाही. केसर नेगी म्हणाले सकाळी आठ वाजण्याच्य सुमारास आम्ही इंडक्शन सुरु करण्याचा प्रयत्न केला आणि आग भडकली. त्यावेळी मला असंही समजलं की आग बाहेरुनही लागली आहे. मी तातडीने माझ्या असिस्टंटला सांगितलं हॉटेलला बाहेरुन आग लागली आहे. मी बाहेर येऊन पाहिलं तर हॉटेल जळत होतं. मी कसाबसा वाचलो. पण रेस्तराँला लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला.

Delhi Hotel Fire
दिल्लीतल्या रेस्तराँला आग. २१ जणांचा मृत्यू (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

पोलिसांनी काय सांगितले?

“घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवांनी बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. आठ अग्निबंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ४० जणांना सुखरुपपणे वाचविण्यात यश आले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याही घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत”, असं दिल्लीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनंत मित्तल मित्तल म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी काय म्हणाले?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दक्षिण-पूर्व यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रेस्तराँला तळघरात कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सात ते आठ जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावरील गाद्यांवर उड्या घेतल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही”, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिली.

पंतप्रधानांकडून मदत जाहीर

आगीच्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दोन लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तर, आगीतील जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीतल्या हॉटेलला ६ खोल्या चालवण्याचाच परवाना होता?

दिल्लीत ज्या इमारतीला आग लागली तिथे ‘फ्लरिश स्टे’नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलला दिल्ली सरकारच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ (B&B) योजनेअंतर्गत केवळ ६ खोल्या चालवण्याचा परवाना होता. मात्र, आग लागली तेव्हा तिथे नियमबाह्यपणे तब्बल २५ खोल्या चालवल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

बेड अँड ब्रेकफास्ट योजना काय?

या योजनेच्या नियमांनुसार, नोंदणीकृत आस्थापनांना जास्तीत जास्त ८ खोल्या आणि १६ खाटांचीच परवानगी असते. त्यामुळे या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असून प्रशासकीय देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. सुरुवातीला या हॉटेलचे नाव ‘लेमन ग्रीन इन’ (Lemon Green Inn) असल्याचे सांगितले जात होते. परंतु, दिल्ली सरकारने ही दुर्घटना हौझ राणी (Hauz Rani) भागातील ‘फ्लरिश स्टे’ हॉटेलमध्ये घडल्याची माहिती दिली. बुधवारी पहाटेच्या सुमारास या गजबजलेल्या भागात ही आग लागली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दल आणि बचाव पथकाने तत्परतेने मोठी मोहीम राबवून धुराचे साम्राज्य पसरलेल्या इमारतीमधून ३७ जणांना सुखरूप बाहेर काढले. आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धुरापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन महिलांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्याचे धक्कादायक दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दुर्घटनेतील अनेक जखमींना उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटल आणि एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.