Delhi Hotel Fire Foreign Nationals investigation : दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘फ्लरिश स्टे हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेले बहुतांश विदेशी नागरिक या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. हौझ राणी परिसरातील अरुंद गल्लीत असलेले हे हॉटेल दिल्लीतील आघाडीच्या वैद्यकीय केंद्रांपैकी एक असलेल्या ‘मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या जवळ आहे.

बांगलादेशमधून आलेल्या तरुणाच्या आईवर आज शस्त्रक्रिया

हॉटेलमधील बहुतांश पाहुणे एकतर स्वतः उपचारासाठी आलेले रुग्ण होते किंवा मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बांगलादेशमधून आपल्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्लीत आलेला २६ वर्षीय विधी पदवीधर (लॉ ग्रॅज्युएट) मिन्हाजुल हसन याने हिंदुस्थान टाइम्सशी (HT) बोलताना सांगितले, “माझ्या आईची आज सकाळी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी मी, माझी आई आणि माझा भाऊ गेल्या पाच दिवसांपासून येथे राहत होतो. मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्येच होतो आणि सुदैवाने आग लागण्याच्या दहा मिनिटे आधीच माझा भाऊ इमारतीमधून बाहेर पडला होता.”

दरम्यान, या आगीत त्यांचे पासपोर्ट इतर सामान खाक झाले असण्याची शक्यता आहे. याबाबत तो म्हणाला, “आमचे सर्व पासपोर्ट आणि सामान आतमध्येच आहे, ते जळून खाक झाले असण्याची आम्हाला भीती वाटत आहे. या इमारतीमध्ये हवेशीर व्यवस्था (व्हेंटिलेशन) नव्हती, कारण तिथे साध्या खिडक्याही नव्हत्या, अगदी बाथरूममध्येही खिडकी नव्हती.”

दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या इमारतीच्या मालकाला अटक केली जाईल. आम्ही कोणत्याही बेकायदेशीर इमारतीला आणि दोषी आढळलेल्यांना सोडणार नाही.” इमारतीला ना-हरकत प्रमाणपत्र (NoC) मिळाले होते की नाही, याची आम्ही चौकशी करत आहोत. बीएनबी (BnB) चालवण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती की नाही, हे आम्ही शोधून काढत आहोत.”

मॅक्स हेल्थकेअरच्या निवेदनात काय?

दरम्यान, मॅक्स हेल्थकेअरने दिल्लीतील आगीच्या घटनेबाबतचे आपले पूर्वीचे निवेदन सुधारित केले आहे. त्यांनी आधी ही घटना सिलिंडरच्या स्फोटामुळे घडल्याचे म्हटले होते. आता आपल्या नवीन निवेदनात, रुग्णालयाने या आगीचे वर्णन केवळ एक आगीची घटना असे केले आहे. मॅक्स हेल्थकेअरच्या म्हणण्यानुसार, “साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल झालेल्या ३९ रुग्णांपैकी १८ जण मृत अवस्थेत होते, १५ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, ज्यात ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. किरकोळ जखमी झालेल्या पाच रुग्णांवर प्राथमिक उपचारानंतर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.”