Delhi Hotel Fire Cook Arrested: दिल्ली हॉटेल आग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ‘फ्लरिश इन स्टेझ’ या बेड-अँड-ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये काम करणाऱ्या स्वयंपाक्याला अटक केली आहे. केशव नेगी असं आचाऱ्याचं नाव आहे. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या हलगर्जीपणामुळेच ही भीषण आग लागली होती. या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतरही काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, आग लागण्यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे. तपास अधिकारी हॉटेलचे मालक लवकेश बजाज यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या आणि सध्या फरार असलेल्या एका अकाऊंटंटच्या (लेखापाल) भूमिकेचीही चौकशी करत आहेत. जय मिश्रा असे या अकाऊंटंटचे नाव असून, तो या हॉटेलच्या दैनंदिन कामकाजात जवळून गुंतलेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, आग लागल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केशव नेगी हा आचारी पळून गेला, असं वृत्त एनडीटीव्हीने पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिलं आहे.
फरार अकाऊंटंट पोलिसांच्या रडारवर
मूळचा बिहारचा असलेला जय मिश्रा गेल्या १५ वर्षांपासून फ्लरिश इनचे मालक लवकेश बजाज यांच्याबरोबर काम करत होता आणि तो दक्षिण दिल्लीतील राजपूर खुर्द भागात राहत होता. पोलीस आता मिश्रावर लक्ष केंद्रित करत आहेत. तो अटक करण्यात आलेला हॉटेल मालक लवकेश बजाज याचा जुना सहकारी आहे. मात्र, आगीच्या घटनेच्या दिवसापासूनच मिश्रा फरार आहे. पीटीआय (PTI) च्या अहवालानुसार, हॉटेलशी संबंधित अनेक कागदपत्रांमध्ये त्याचे नाव आढळून आले आहे. तपास अधिकाऱ्यांना मिश्राच्या नावावर हॉटेलशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलचे रेकॉर्ड मिळाले आहेत. तो केवळ एक अकाऊंटंट होता की त्याचा या व्यवसायात मोठा वाटा होता, याचा शोध अधिकारी घेत आहेत.
मिश्राला दरमहा सुमारे १८,००० रुपये पगार मिळत होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली असून, एक पथक बिहारला रवाना करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, मिश्राकडे हॉटेलची आर्थिक गणिते, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, कामकाजाचे नियंत्रण, नियामक परवानग्या आणि ग्राहकांच्या नोंदींबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे.
