IRS Officer Daughter Murder investigation highlights the dark background of the 19-year-old accused : दिल्लीतील एका घरात बुधवारी सकाळी भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आयआरएस अधिकार्‍याच्या घरी पूर्वी घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय राहुल मीना याला दिल्लीतील द्वारका येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १० तासांत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान घटनेचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मीना याच्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मीना हा राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगड येथून १८ महिन्यांपूर्वी दिल्लीतील या कुटुंबाकडे काम करण्यासाठी आला होता.

“पीडितेच्या वडिलांना अलवरमधील कुठल्यातरी जीएसटी अधिकाऱ्याने फोन केला होता, ज्यांनी सांगितले की मीना हा त्यांच्या कार्यालयात काम करायचा आणि तो त्यांच्या कामाला येईल… त्या अधिकाऱ्यांनी त्याला कामावर ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे, कुटुंबाने कोणतीही पडताळणी न करताच त्याला कामावर ठेवले,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एका शेजाऱ्याने सांगितले की, मीना हा इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या नोकरांसाठीच्या खोलीत राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात काम सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच, मीनाने कुटुंबाने त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती.

तो दुकानात जायचा, घरासाठी आवश्यक वस्तू विकत घ्यायचा आणि त्याचे पैसे कुटुंबाच्या खात्यावर लिहायला सांगायचा… तो दुकानदारांना महिन्याच्या अखेरीस कुटुंबाकडून पैसे घेण्यास सांगायचा आणि पैसे स्वतःकडे ठेवायचा,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

एका स्थानिक केमिस्टने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “तो एकदाच ४००-५०० रुपयांची औषधे विकत घ्यायचा आणि मला त्याचे पैसे त्याच्या मालकाकडून घेण्यास सांगायचा. मुलगा सभ्य दिसतायचा आणि मृदू भाषेत बोलायचा, त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवायचो.”

“पण नंतर वडिलांनी मला पैसे घेतल्याशिवाय राहुलला औषध न देण्याची ताकीद दिली,” असेही दुकानदाराने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, मीना दुकानातून वस्तू खरेदी करायचा पण त्याचे पैसे देत नसल्याबद्दल कुटुंबाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. अखेर, दोन महिन्यांपूर्वी जेव्हा शेजाऱ्यांनी तक्रार केली की त्याने त्यांच्याकडून कथितरीत्या दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, तेव्हा त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.

“घरात काम करणारे येत जात असतात, आणि नियम मोडल्यास बऱ्याचदा त्यांना काढून टाकले जाते. त्याला फक्त नम्रपणे निघून जाण्यास सांगितले होते,” असे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. पण राहुलने हे मनावर घेतल्याचे पोलीस म्हणाले.

प्राथमिक तपासात असे समोर आले की त्याला बेटिंग ॲप्सचा नाद होता आणि तो अमली पदार्थांच्या आहारी गेलाला आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, राहुल मंगळवारी रात्री राजगडमध्ये होता आणि दिल्लीला येण्यापूर्वी त्याने तिथे एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बुधवारी सकाळी अलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पुढे पोलिसांनी सांगितले की, राहुलने कथितपणे मंगळवारी ती मोबाइल फोन १३ हजार रुपयांना विकले आणि अलवरहून दिल्लीला येण्यासाठी ६ हजार रुपये देऊन एक अॅम्बुलन्स म्हणून वापरली जाणारी कार बुक केली. पण दिल्लीत पोहचल्यावर तो चालकाल पैसे न देताच गाडीतून उतरून पळून गेला.

“राहुलने त्याचा स्वतःचा फोन १० हजार रुपयांना आणि त्याच्या भावाचा आणि मित्राचा फोन प्रत्येकी ३ हजार रुपयांना एका स्थानिक दुकानदाराला विकला… त्याने कथितपणे दुकानदाराला सांगितले होते की, तो परत येऊन त्याचे पैसे परत करेल आणि आपले सर्व फोन पुन्हा विकत घेईल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

“तपासात असेही समोर आले आहे की, तो एका खासगी रुग्णालयाची रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जाणाऱ्या Eeco व्हॅनमधून दक्षिण दिल्लीत आला होता. ज्या घरी त्याला जायचे होते, ते घर शोधण्याच्या बहाण्याने तो गाडीतून उतरला आणि ड्रायव्हरला पैसे न देताच तिथून पळून गेला. तिथून तो चालत पीडितेच्या घरी पोहोचला,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.