Delhi Murder Case : दिल्लीच्या कैलास हिल्स परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका आयआरएस अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आता या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
या आरोपीबाबत प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जात असताना आरोपी राहुल मीना हा फोनवर कोणाशी बोलत होता? याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर घरातून बाहेर पडताना आरोपी सतत फोनवर बोलत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपीच्या आईने सांगितलं की, आरोपीने दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाला फोन केला होता आणि तो त्याच्याशी बोलत होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार आरोपी राहुल फोनवर त्याच्या भावाला म्हणाला की, “मैंने दिल्ली में कांड कर दिया है, मैं अब मरने वाला हूँ, बच नहीं पाऊंगा, पोलीस मुझे पकड लेगी.”
दरम्यान, दिल्लीतील गुन्हा करण्याआधी आरोपी राहुल मीनाने राजस्थानच्या अलवरमध्येही एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
२४ तासांत २ बलात्कार १ खून
दिल्लीमधील एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईलच्या चार्जरने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी राहुल मीना (२३ वय) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेच्या आधी या आरोपीने आणखी एका दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. म्हणजे २४ तासांत २ बलात्कार आणि एक १ खून आरोपीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी काय घडलं?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला घराची आणि सुरक्षा व्यवस्थेची सर्व माहिती होती. त्यामुळे आरोपी त्या घरात प्रवेश करू शकला. घरात प्रवेश केल्यानंतर पीडितेच्या स्टडी रूममध्ये त्याने जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने जड वस्तूने तिला मारहाण केली आणि नंतर तिचा गळा दाबला. त्यानंतर ती बेशुद्ध असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह छतावरील स्टडी रूममधून खाली ओढत आणला आणि तिच्या बोटाने लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रोकड आणि दागिने चोरले. मात्र, या घटनेच्या वेळी आरोपीचे कपडे रक्ताने माखले होते. त्यामुळे पीडितेच्या भावाचे कपडे घातले आणि घटनास्थळावरून पळ काढला, असं वृत्तांत म्हटलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसून आलं?
दिल्ली पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तेव्हा पोलिसांना असं आढळून आलं की, आरोपी सकाळी ६.२८ च्या सुमारास पिवळा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करताना दिसून आला. त्यानंतर ७.२२ च्या सुमारास वेगळ्या कपड्यांमध्ये आणि पाठीवर एक बॅग घेऊन तो बाहेर पडतना दिसून आला. घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर तो ज्या ऑटो-रिक्षात बसला, तिचा तपास अधिकाऱ्यांनी माग काढला असता पोलीस द्वारका येथील एका हॉटेलपर्यंत पोहोचवले. त्या ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये आरोपीने चेक-इन केलं होतं. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून पीडितेच्या घरातून चोरलेली १ लाखांहून अधिक रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले. तसेच हॉटेलच्या खोलीचे भाडे देखील चोरलेल्या पैशातूनच आरोपीने दिले होते. पोलिसांना काही तासांतच आरोपीला अटक करण्यात यश आलं असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.
अलवरच्या घटनेत काय घडलं?
अलवरच्या घटनेबाबत पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी जेव्हा दिल्ली पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या अलवरला पोहोचलं, तेव्हा त्यांना समजलं की, मंगळवारी रात्री १० वाजता आरोपी मीना याने त्याच्या एका मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. त्या तक्रारीत त्या महिलेने आरोप केला की आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तिच्या म्हणण्यांनुसार, आरोपी तिच्या पतीचा मित्र आहे. तो मंगळवारी रात्री उशिरा तिच्या घरी आला. पण तेव्हा तिचा पती एका लग्नाला गेलेला होता. यावेळी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आरोपी राजस्थानमधून दिल्लीत कसा आला?
अलवरमधील घटनेनंतर आरोपी मीना हा लगेचच अलवर सोडून दिल्लीला रवाना झाला. यावेळी त्याने आपला एक फोन १० हजारांना विकला. त्यानंतर एक व्हॅन भाड्याने घेतली आणि तो दिल्लीला पोहोचला. यावेळी आरोपीने त्या चालकालाही पैसे न देताच निघून गेला. त्यानंतर सकाळच्या सुमारास तो दिल्लीतील कैलास हिल्स परिसरात पोहोचला. त्यानंतर तो एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या घरी गेला आणि त्यांच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.
