Rahul Meena IRS Daughter Murder Case Update: दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी करून त्यांच्या २२ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. गुन्हा करणारा २३ वर्षीय आरोपी राहुल मीना हा त्याच घरात काही काळापूर्वी घरकाम करत होता. मात्र व्यसनी वृत्ती आणि पैशांचा गैरव्यवहार करत असल्यामुळे त्याला नोकरीवरुन काही महिन्यांपूर्वी काढून टाकले होते. नोकरीवरुन काढल्याचा राग आणि सूडभावनेने पेटलेल्या राहुल मीनाने क्रौर्याची परिसीमा गाठणारे कृत्य केले. पोलीस तपासात आरोपीने गुन्हा कसा केला, याची तपशीलवार माहिती दिली.
आयआरएस अधिकाऱ्याची मुलगी आयआयटी पदवीधर होती. यूपीएससीची तयारी करत असल्यामुळे पालक जिमला गेलेले असताना गच्चीवरील घरात ती अभ्यास करत होती. घराच्या अतिरिक्त चाव्या कुठे आहेत, हे आरोपीला माहीत होते. त्याद्वारे त्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर तो गच्चीवर गेला. तिथे मुलीच्या खोलीचा दरवाजा ठोठावून तिला बाहेर येण्यास सांगितले.
आरोपीने दरवाजा ठोठावल्यानंतर मुलीने ‘कोण आहे?’ असा आतून आवाज दिला. त्यावर आरोपीने म्हटले की, तो गावावरून परतला असून तिच्या वडिलांनी काही सामान पाठवले आहे. यावर मुलीने उत्तर दिले की, सामान खोलीच्या बाहेरच ठेव. मी थोड्यावेळाने घेईल. यानंतर आरोपीने खोलीबाहेरच काही काळ तिची वाट पाहिली, पण ती बाहेर न आल्यामुळे तो छतावरून घरात शिरला.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाण्याच्या पाईपला धरून छतावर गेला. त्यानंतर छतावरील फायबर शीट बाजूला करून तिथून तो बाथरुममध्ये उतरला आणि घरात शिरला. सुरुवातीला त्याने मुलीकडे पैशांची मागणी केली. वडिलांकडून पैसे घे, असे सांगून मुलीने वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने फोन हिसकावून तो दूर फेकला.
मीनाने पोलिसांना सांगितले की, मुलीने आरडाओरडा केल्यामुळे त्याने तिचे तोंड दाबले. “पीडिता प्रतिकार करू लागल्यानंतर बाजूला असलेल्या टेबल लॅम्प आणि पाण्याच्या बाटलीने आरोपीने तिला मारहाण केली. शुद्ध हरपत असताना तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार करत असताना आरोपीचा चावा घेतला. यानंतर आरोपीने तिचा चार्जिंगच्या केबलने गळा आवळला”, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
केसांना धरून खालच्या मजल्यावर आणले
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृत तरुणीच्या केसांना ओढत खालच्या मजल्यावर आणले. तिथे एका खोलीत लॉकर असल्याची त्याला कल्पना होती. मृत मुलीच्या बोटांच्या ठशांनी त्याने लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बोटांना रक्त लागले असल्यामुळे लॉकर उघडू शकले नाही. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने लॉकर उघडले.

रोकड आणि दागिने घेऊन पसार
आरोपी मीनाने लॉकरमधील अडीच लाखांची रोकड आणि दागिने काढले. स्वतःचे रक्ताने माखलेले कपडे काढून मृत तरुणीच्या भावाचे कपडे घातले. यानंतर मृत तरुणीचा आयफोन आणि एक बॅग घेऊन तिथून पळ काढला. मात्र घराबाहेर जाण्याआधी त्याने त्याचे बूट तिथेच सोडले आणि त्याची जुनी स्लिपर घालून तो पसार झाला.
हॉटेलमध्ये जाऊन चिकन करीवर ताव
गुन्हा केल्यानंतर राहुल मीना दिल्लीच्या द्वारका येथील एका हॉटेलमध्ये गेला. खोलीचे भाडे दीड हजार रुपये होते. मात्र कागदपत्रे नसल्यामुळे हॉटेलने त्याच्याकडून २,००० रुपये घेतले. खोलीत गेल्यानंतर राहुलने क्विक कॉमर्स साइटवरून टी-शर्ट ऑर्डर केले. त्यानंतर चिकन करी आणि रोटी मागवली.
आयआरएस अधिकाऱ्याच्या घरातून चोरलेल्या मोबाइलद्वारे आरोपी गुरुग्राममधील आपल्या चुलत भावाच्या संपर्कात होता. यावेळी त्याने हॉटेलचे वाय-फाय वापरले होते. पोलिसांनी फोनच्या लोकेशनवरूनच तो हॉटेलमध्ये असताना त्याच्या मुसक्या आवळल्या.
वडिलांमुळे मिळाली होती अधिकाऱ्याच्या घरी नोकरी
पदवीधर असलेला राहुल मीना तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आला होता. द्वारका येथे सुरुवातीला बांधकाम मजूर म्हणून काम केल्यानंतर त्याला १८ महिन्यांपूर्वी ही नोकरी मिळाली होती. राजस्थानच्या अलवर येथील असलेल्या राहुल मीनाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्या कार्यालयात आयआरएस अधिकारी काही काळापूर्वी आले होते. तेव्हा त्यांच्याकडे विनंती करून आरोपी राहुलला त्यांच्या घरातील नोकर म्हणून त्यांनी काम मिळवून दिले होते.
ऑनलाइन जुगाराचे व्यसन, ७ लाखांचे कर्ज
पोलिसांनी सांगितले की, राहुल मीनाला पगाराच्या रुपात नियमित पैसे मिळू लागल्यानंतर त्याने मोबाइलवर ऑनलाइन तीन पत्ती हा गेम खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला काही पैसे जिंकल्यानंतर आपण यातून झटपट पैसे कमवू शकतो, असा विश्वास त्याला वाटला.
आरोपी राहुलला उंची जीवनशैली जगण्याचे आणि महागड्या वस्तू, गाड्या घेण्याचे स्वप्न होते. त्याच्या सोशल मीडिया हँडलवर यासंबंधी बरेच व्हिडीओ तपासकर्त्यांना आढळले. आयआरएस अधिकाऱ्याच्या परिसरातील अनेक आलिशान वाहनांबरोबर त्याने स्वतःचे फोटो काढले होते.
ऑनलाइन गेममध्ये पैसे गमवू लागल्यानंतर आरोपी राहुल मीनाने परिसरातील दुकानदारांकडे उधारी ठेवण्यास सुरुवात केली. तसेच शेजाऱ्यांकडून उसने पैसे घेतले, कर्जही काढले. त्याच्यावर एकूण सात लाख रुपयांचे कर्ज झाले होते. अखेर त्याने स्वतःचा मोबाइल गहाण ठेवून १० हजार रुपये मिळवले आणि तेही जुगारात घालवले.
पोलिसांच्या अंदाजानुसार, डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी आरोपी राहुलने आयआरएस अधिकाऱ्याच्या घरातच चोरी करण्याचे ठरवले असावे. घरातील सदस्य कधी बाहेर जातात, घरात लॉकर कुठे आहे? याची त्याला पक्की माहिती होती. त्याप्रमाणे त्याने घरात प्रवेश मिळवून भयंकर गुन्हा केला.
