Delhi Crime Update: Accused Rahul Meena statent to IRS officer daughter murder to access house locker : दिल्लीमधील कैलास हिल्स परिसरात एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीची मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून हत्या करण्यात आली. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू असून या प्रकरणातील आरोपी राहुल मीना याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल याला गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने न्यायालयात कबुली दिली की, त्याने पैशांसाठी हा भीषण गुन्हा केला. इतकेच नाही तर पीडितेच्या हाताचे ठसे वापरून घरातील कॅश लॉकर उघडता यावे, यासाठी त्याने तिचा मृतदेह फरफटत नेला होता. दिल्ली न्यायालयाने १९ वर्षीय मीना याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

“तपास हा प्राथमिक स्तरावर आहे…. आम्हाला सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हा एक अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. आम्ही त्याच्याविरोधातील अलवरमधील अशाच एका प्रकरणाचा तपास करत आहोत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. मीना याला साकेत कोर्टाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दीपिका ठाकरन यांच्या समोर हजर करण्यात आले होते.

तुमच्या एमएलसीमध्ये जखमांचा उल्लेख आहे. त्या कशा झाल्या? जेएमएफसी ठाकरन यांनी मीना याला विचारले. त्याने न्यायालयात काळा शर्ट घातला होता आणि त्याचे तोंड पांढऱ्या कपड्याने बांधलेले होते. “त्या मला टेरेसावरून उतरतेवेळी झाल्या,” असे उत्तर राहुल मीना याने दिले. “कोणत्या टेरेसवरून,” असा प्रश्न न्यायाधिशांनी त्याला विचाराला. ज्यावर “मुझसे अपराध हो गया मॅम… गलती हो गयी” असे उत्तर मीना याने दिले.

हे ऐकल्यावरन्यायाधीशांनी त्याला विचारले की त्याने हा कथित गुन्हा का केला. “पैसे के लिए किया (मी हे पैशांसाठी केले),” असे उत्तर मीना याने दिले. जेएमएफसी ठाकरन म्हणाल्या , “मग असे कृत्य कशासाठी?”

“मी चूक केली मॅडम…लॉकर उघडण्यालाठी बोटांचे ठसे (मृत तरुणीच्या) हवे होते,” उत्तर मीना याने दिले.

“म्हणजे तू गुन्हा कबूल करत आहेस… मी याला अधिकृत कबुलीजबाब मानणार नाही,” असे न्यायाधीश म्हणाल्या आणि त्यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील लॉकर हे फक्त तीन व्यक्तींच्या बोटांचे ठसे वापरून उघडता येत होते. ते म्हणजे आयआरएस अधिकारी, त्यांची पत्नी किंवा त्यांची मुलगी. त्याने पीडितेला लॉकर उघडायला सांगितले, पण तिने नकार दिला. जेव्हा त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने प्रतिकार केला.