Jantar Mantar Protest Ban News : नवी दिल्लीतील आंदोलनांचे मुख्य केंद्र असलेल्या जंतर-मंतर येथे आता आंदोलने किंवा निदर्शने करता येणार नाहीत. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला आंदोलनाचे अधिकृत ठिकाण म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. याऐवजी राजधानीत आंदोलने करण्यासाठी पोलिसांनी तीन नवीन मैदानांची घोषणा केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं.
केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींनुसार दिल्ली पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या आंदोलनाचा हक्क शांततापूर्ण मार्गाने बजावता यावा, यासाठी ही नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार, नागरिकांना रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान येथे नागरिकांना शांततेत आंदोलन करता येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार, जंतर-मंतरवरील सुरक्षेची आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन नवीन ठिकाणी आंदोलने करण्यासाठी लवकरच नवीन नियमावली जारी केली जाणार असून, त्यानुसारच परवानगी दिली जाईल. विशेष म्हणजे, ही तीन ठिकाणे मध्य दिल्लीत असलेल्या जंतर-मंतरपासून अनुक्रमे ३ किमी, १३.५ किमी आणि ४४ किमी अंतरावर आहेत.
सीजेपीने मागितलं स्पष्टीकरण
सीजेपी आणि दिल्ली पोलीस यांच्यात जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश आला आहे. सीजेपीच्या नेत्यांनी सोमवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना, आंदोलनासाठी तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच परवानगी नाकारण्याबाबत स्पष्टीकरण मागितलं.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, पक्षाने शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या आपल्या हेतूविषयी पोलिसांना रीतसर कळवलं होतं आणि पोलिसांनी ती माहिती स्वीकारलीही होती. मात्र, आंदोलनासाठी कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही आणि पक्षाला या निर्बंधांविषयी कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. “आम्हाला तारीख देण्यासाठी आम्ही त्यांना २४ तासांचा वेळ दिला आहे”, असं सांगत दास यांनी इशारा दिला की, जर पोलिसांनी या मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर सीजेपी मोर्चा काढण्याची घोषणा करेल.
दास यांनी अलीकडेच आंदोलकांवर झालेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोपही केला. आंदोलकांना बसच्या आत मारहाण करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलीस उपायुक्तांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी बोलणं टाळल्याचा आरोपही त्यांनी केला. “भारत सरकार आपल्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारत आहे,” असं म्हणत दास पुढे म्हणाले की, पक्ष आपले शांततापूर्ण आंदोलन सुरूच ठेवेल.
दरम्यान, जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनाची जागाच्या यादीतून वगळल्यानंतर अभिजीत दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “त्यांनी जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणून रद्द केलं आहे. होय, ते आता आंदोलनाचे ठिकाण राहिलं नाही, कारण तसंही त्या भ्याड हुकूमशाहाने त्याचं युद्धभूमीत रूपांतर केले होते. आता संपूर्ण देश जंतरमंतर बनेल! “
