नवी दिल्ली : ‘जंतर-मंतरच्या दिशेने निघा, जिथे तुम्हाला अडवले जाईल तेच तुमचे जंतर-मंतर आहे असे समजा आणि आंदोलन करा’, असे आवाहन ‘एआयएसए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या नेहा बोरा यांनी केले होते. त्याची प्रचीती शनिवारी दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली. राजधानीत सात हजार जणांची धरपकड करण्यात आली.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीसह (सीजेपी) विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचे लोण देशभर पसरले. तर, निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्ती दिल्लीकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. निवडणूक न जिंकता सत्तेसाठी विरोधकांचा अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली. कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेची) रविवारीही आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने आंदोलनकर्त्यांची तातडीने सुटका करावी अशी मागणी केली आहे. चार माजी मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईतही आंदोलनाचे पडसाद उमटले. तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय रविवारी सुनावणी होणार आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी), माकप-भाकप आदी डावे पक्ष व त्यांच्या एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ आदी विद्यार्थी संघटना तसेच, आम आदमी पक्ष (आप) तसेच, तृणमूल काँग्रेस यांनी जंतर-मंतर २.०च्या आंदोलनाची हाक दिली होती. जंतर-मंतरच्या आंदोलनस्थळाकडे जाणारे रस्त्यांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्यामुळे मध्य दिल्लीच्या बाहेर आंदोलन सुरू करण्याची रणनिती डाव्या विद्यार्थी संघटना व आंदोलकांनी आखली होती.
दिल्ली हाट परिसरात नेहा बोरा, माकप-मालेचे महासचिव दिपंकर भट्टाचार्य, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आदींनी तरुण कार्यकर्त्यांसह जंतर-मंतरकडे कूच केली. पोलिसांनी नेहा बोरा यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण, सुमारे तासभर पोलिसांना नेहा बोरा यांना बसगाडीमध्ये बसवण्यासाठी मेहनत करावी लागली. बोरा यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले गेले मात्र, आंदोलक बसगाडीसमोर आडवे पडले, काहींनी बसगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरकडे जाणारे मार्ग बंद केले तरीही आंदोलकांना विविध ठिकाणी निदर्शने करण्यासाठी वाटा मिळाल्याच. आयएनए, दिल्ली हाट, सफदरजंग उड्डाणपूल, जोर बाग आणि दिल्लीच्या अन्य परिसरांत आंदोलकांचे छोटे गट जमले. जंतर-मंतरवर मोठा जमाव पोहोचू शकत नव्हता. मात्र, दिल्लीत अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून ताब्यात घेऊन पोलिसांनी आंदोलकांची गळचेपी केली.
दिल्ली हाट भागात नेहा बोरा व इतर आंदोलक एकत्र आले. त्यांनी तिथून चलो जंतर-मंतरचा नारा देत हे आंदोलक काही अंतरावरील आयएनए मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचताच त्यांना अडवले गेले. तिथल्या फ्लायओव्हरकडे जाणार्या रस्त्याकडे फक्त बॅरिकेट्सचा एकच रांग लावलेली होती. शिवाय, पोलिसांची कुमक कमी होती, त्यामुळे हजारोंच्या संख्येने गोळा झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणताना दिल्ली पोलिसांची पुरती दमछाक झाली. दिल्लीची प्रवेशद्वारे, मध्य आणि ल्युटन्स दिल्लीतील सर्व प्रमुख मार्ग, गल्लीबोळ पोलिसांनी नाकाबंदी करून बंद केले तरीही हजारो तरुणांनी सफदरजंग एअरपोर्ट भागांत अचानक जमून संघर्षाला सुरुवात केली. आम्हाला ताब्यात घेतले तरी आम्ही पुन्हा येणार आणि आंदोलन करणारच, असा निर्धार नेहा बोरा यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर व्यक्त केला. संध्याकाळपर्यंत पोलिसांनी सात हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.
पोलिसांची अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. आणखी पोलीस गाड्याही आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाल्या. नेहा बोरा व काही आंदोलकांनी ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलकांचा दुसरा गट तिथे दाखल झाला. त्यामुळे एकाच वेळी सर्व आंदोलकांनी बाहेर न पडता टप्प्याटप्प्याने आणि गटागटाने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची रणनिती जेन-झी तरुण आंदोलकांनी आखल्याचे स्पष्ट झाले. ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरा यांनी एक्सवरून, ‘‘जंतर-मंतर २.० सुरू झाले आहे. तुम्हाला (पोलिसांना) काहींना ताब्यात घेता येईल, सगळ्यांना नाही… मी ताब्यात आहे; पण, आंदोलन नाही. जिथे थांबवतील तिथेच बसा आणि आंदोलन सुरू करा,’’ असे आवाहन केले. यादव, भूषण, भट्टाचार्य यांच्यासह ५०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या भागांत संध्याकाळनंतरही आंदोलकांचा जोर कायम होता.
चार माजी मुख्यमंत्रीही आंदोलनात
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे पी. विजयन व त्रिपुराचे माणिक सरकार या सर्वांनाही ताब्यात घेण्यात आले.
दिपके, दास, रांका ताब्यात
‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके, नेते सौरव दास आणि आशुतोष रांका शनिवारी मुंबईहून दिल्लीला पोहोचताच विमानात जाऊन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण ‘सीजेपी’ने समाजमाध्यमांवर प्रसारित केले. दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘सीजेपी’ने पुढील आंदोलनाची जबाबदारी महाराष्ट्रातील सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवली. अलिबागचे रहिवासी असलेले शिंदे हे पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित होते. ‘सीजेपी’च्या म्हणण्यानुसार दिपके यांच्या आजीच्या निधनाची माहिती पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली; मात्र कुटुंबीय किंवा वकिलांना दिपके यांचे ठिकाण कळवण्यात आले नाही. पोलिसांकडून वैयक्तिक दु:खाच्या प्रसंगीही ‘क्षुद्र राजकारण’ केले जात असल्याचा आरोप ‘सीजेपी’ने केला. यूट्यूबर ध्रुव राठी याला गुरुग्रामच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
देशाविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मोदींना भोगावी लागेल. विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
देशातील शांतता, सलोखा आणि विकासाला बाधा आणण्याच्या उद्देशाने विरोधक धोकादायक अराजकवादी स्पर्धेत उतरले आहेत. -नितीन नवीन, भाजप, अध्यक्ष
