गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे. नीटच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरूनच सोनम वांगचुक हे देखील दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसले होते. पण पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं असून वांगचुक यांनी अद्याप त्यांचं उपोषण सोडलेलं नाही.

दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे दिल्लीत आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून अनेक मोठ्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर १८ जुलै रोजी शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे जंतर-मंतरवर पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज (२२ जुलै) जंतर-मंतरजवळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान जंतर-मंतरजवळ पोलीस आणि काही आंदोलकांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीतील संसद मार्गाजवळ पुन्हा तणाव निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. तसेच घटनास्थळी दिल्लीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. या गोंधळादरम्यान आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यात आल्या आहेत. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या संदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं?

अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, “मला अशी माहिती मिळत आहे की जंतर-मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून निमलष्करी दलाची काही जवान तिथे दाखल झाले आहेत. लोकांच्या मनात कारवाईची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांना मला सांगायचं आहे की, कोणतीही चुकीची कृती किंवा धाडस करू नका. तुम्हाला वाटलं होतं की सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर हे आंदोलन संपेल. पण ते अधिक बळकट झालं. तुम्हाला वाटलं होतं की लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर विद्यार्थी घाबरून जातील. पण हे आंदोलन अधिकच व्यापक झालं. ही ‘जनरेशन झेड’ (Gen Z) पिढी आहे. ते कोणालाही घाबरत नाहीत. तुम्ही त्यांना जेवढं जास्त दडपण्याचा प्रयत्न कराल, तितकेच ते अधिक ठामपणे आणि निर्भयपणे पुढे येतील. त्यामुळे कोणतीही दडपशाही किंवा कठोर कारवाई करू नये”, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.