दिल्लीतील जंतरमंतरवर एका आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी एका ट्रान्सजेंडर आंदोलकाला ताब्यात घेण्यापूर्वी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही वैयक्तिक बाब सार्वजनिक न करता, त्या महिला पोलिसाने अत्यंत आदराने घेतलेल्या भूमिकेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

नेमकी घटना काय?

जंतरमंतरवर सुरू असलेल्या एका आंदोलनादरम्यान महिला पोलिसांचा एक गट आंदोलकाजवळ जाताना या व्हिडीओत दिसत आहे. यावेळी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्या आंदोलकाजवळ झुकून अगदी शांतपणे काहीतरी विचारले. त्यावर आंदोलकाने, “तुम्ही मला ताब्यात घेऊ शकत नाही मॅडम, मी पत्रकार आहे आणि माझ्याकडे प्रेस कार्ड आहे,” असे उत्तर दिले.

लिंग ओळखीबाबत दाखवलेली संवेदनशीलता

पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने अत्यंत नम्रपणे, “तुम्हाला महिला पोलिस अधिकाऱ्याची गरज आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर त्या आंदोलकाने, “मी ट्रान्सजेंडर आहे,” असे स्पष्ट केले. हा संवाद अवघ्या काही सेकंदांचा होता, त्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलकाला आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतले.

नेटकऱ्यांकडून पोलिसांच्या कृतीचे कौतुक

आंदोलकाची ओळख किंवा लिंग ओळख सर्वांसमोर उघड न करता, आदराने आणि शांतपणे विचारपूस केल्याबद्दल सोशल मीडियावर या महिला पोलिसाचे कौतुक होत आहे. मात्र, या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून संबंधित आंदोलकाला नेमक्या कोणत्या कारणावरून किंवा कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जंतरमंतरवर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आंदोलन

दरम्यान, जंतरमंतरवरील हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेविरोधात पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले.

या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनाही आकाशवाणी भवन परिसरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि परिस्थिती बिघडू नये यासाठी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.