नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचा बुधवारी १२वा दिवस असून उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबरोबर ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (एआयएसए) विद्यार्थ्यांबरोबरच पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हेही उपोषण करत असून बुधवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना थकवा जाणवत असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, इनेश हा विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत असून मंगळवारी रात्री त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी दिली. इनेशच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिपके यांनी एक्सवर लिहिले. देशभरात विविध ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटण्याच्या आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत असून सरकारला उत्तरदायी ठरवण्याची मागणी वाढत आहे, असे दिपके यांनी म्हटले आहे.

उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा सचिव दानिश याचाही समावेश आहे. त्याच्या रक्तातील साखरेची पातळी ६१पर्यंत खाली घसरल्याचे ‘एआयएसए’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.