दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ३० वर्षीय तरुण न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी त्यांच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. ही घटना आज (२ मे) दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती सांगितली जात आहे. या घटनेमुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीश अमन कुमार शर्मा हे दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात राहत होते. मात्र, शनिवारी त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते दिल्लीतील करकरडूमा न्यायालयात कार्यरत होते. अमन कुमार शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात एक कॉल आला होता आणि त्यावरून ग्रीन पार्क येथील रहिवासी अमन कुमार शर्मा यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. शर्मा हे दिल्लीतील करकरडूमा न्यायालयात डीएलएसएचे (दिल्ली पोलीस सुरक्षा विभाग) सचिव म्हणून कार्यरत होते.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी आणि शर्मा यांचा मेहुणा असलेल्या व्यक्तीनेच या घटनेबाबत पोलिसांना फोन केला होता. आता शर्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”

वृत्तानुसार, अमन कुमार शर्मा हे १९ जून २०२१ रोजी दिल्लीत न्यायिक सेवेत रुजू झाले होते. त्यांनी २०१८ मध्ये पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये एलएलबी पूर्ण केली होती. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी विविध फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे हाताळली होती. आता त्यांच्या पश्चात दोन मुले, त्यापैकी एक नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाचं आहे आणि त्यांची पत्नी स्वतः एक न्यायाधीश आहेत.