Kejriwal news: शनिवारी (ता. २८) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (ता. २७ फेब्रुवारी) न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला. या निकालात आप नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्यासह इतर २०-२२ आरोपींना सीबीआय प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

सिब्बल यांनी सरकारला प्रश्न विचारला की, “केजरीवाल यांनी तुरुंगात घालवलेले १२६ दिवस आणि सिसोदिया यांनी घालवलेले ५०३ दिवस याची जबाबदारी कोण घेणार? त्याची भरपाई कोण करणार? यासाठी जबाबदार कोणीतरी असलेच पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, भाजपकडून हा १०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र न्यायालयात कोणताही आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला नाही. “विरोधकांवर खोटे आरोप लावून त्यांना अडकवणे ही चुकीची पद्धत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

केजरीवालांची निर्दोष मुक्तता

दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात राऊज एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल आणि सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. निकालानंतर केजरीवाल म्हणाले, “हा सत्याचा विजय आहे. आमच्यावर मोठा राजकीय कट रचण्यात आला. आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात ठेवण्यात आले.”

ते पुढे म्हणाले, “माझ्यावर आणि सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, पण आम्ही भ्रष्टाचारी नाही. आमच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली. सत्तेसाठी देश आणि संविधानाशी असा व्यवहार करू नका. खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा चांगले काम करून सत्तेत या.” असे म्हणताना केजरीवाल भावूक झाले.

“कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही”

भाजपचे राष्ट्रीय आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर आपले मत व्यक्त करत म्हटले, “दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणातील हा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कार्यवाहीदरम्यान कडक आणि निंदनीय निरीक्षणे नोंदवली आहेत. हा निकाल उच्च न्यायालयात टिकतो की नाही, हे पाहणे बाकी आहे. कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.”