दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्तराँला लागलेल्या आगीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु झालं आहे. पण दिल्लीत घडलेली ही काही पहिली घटना नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे दिल्ली रडली आहे. आपण जाणून घेणार आहोत अशाच घटनांबाबत.

दिल्लीत मदत आणि बचावकार्य सुरु

दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार लेमन ग्रीन रेस्तराँ या ठिकाणी आग लागली. सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. या घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. दिल्लीत उपहार सिनेमागृहात लागलेली आगही अशीच अत्यंत भीषण होती. आजतकने हे वृत्त दिलं आहे.

मालवीय नगरमधली घटना नेमकी काय?

दिल्लीतलं मालवीय नगर हा उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या रेस्तराँला आग लागली. त्यामुळे रेस्तराँ मध्ये तर हलकल्लोळ उडालाच पण या घटनेत हॉटेलमध्ये थांबलेल्या २१ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले, भाजले. अग्निशमन दलाने इथे पोहचून मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.

नागरिकांनी गाद्यांवर उड्या घेतल्या

मालवीय नगरमधील रेस्तराँला अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सर्वत्र धावाधाव सुरु केली. मिळेल त्या मार्गाने अडकून पडलेले नागरिक मार्ग काढत होते. वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाद्यांवर उड्या घेतल्या. दक्षिण दिल्लीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनंत मित्तल यांनी या घटनेबाबत एएनआयला माहिती दिली. “सकाळी आठ वाजून ४८ मिनिटांनी मालवीय नगरमधील फ्लोरिश स्टे बी&बी रेस्तराँला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.”

उपहार चित्रपट गृहात लागलेल्या आगीत ५९ जणांचा मृत्यू

दिल्लीतल्या उपहार चित्रपटगृहात १३ जून १९९७ रोजी आग लागली होती. बॉर्डर या चित्रपटाचा खेळ सुरु होता. या दरम्यान ट्रान्सफॉर्मर खराब झाला आणि शॉर्ट सर्किट होऊन चित्रपटगृहाने पेट घेतला.या घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. दिल्लीतलं भीषण अग्निकांड म्हणून याकडे पाहिलं जातं. उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवर Trial By Fire ही वेबसीरिजही येऊन गेली.

Delhi Fire Incidents
दिल्लीत १९९७ मध्ये उपहार चित्रपटगृहाला आग लागली होती. या आगीत ६१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

करोल बाग हॉटेल अर्पित पॅलेस अग्निकांड

१२ फेब्रुवारी २०१९ च्या सकाळीही दिल्लीत अशीच घटना घडली. करोल बाग भागात अर्पित पॅलेस नावाचं आलीशान हॉटेल होतं. या हॉटेलला सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या हॉटेलमध्ये लाकडी वस्तू आणि बांधकामातही लाकडं वापरली होती. तसंच आपात्कालीन दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे लोक आतमधेच अडकले. १७ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनेही दिल्ली हादरली होती. डिसेंबर २०१९ ला दिल्लीतल्या झांसी मार्गावर धान्य बाजारात एका इमारतीला आग लागली. या आगीत ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ६० हून अधिक लोक जखमी झाले होते.

मुंडका व्यापारी वसाहतीच्या इमारतीला २०२२ मध्ये लागली होती आग

पश्चिम दिल्लीतल्या मुंडका या मेट्रो स्टेशनजवळ एका चार मजली व्यावसायिक वसाहतीच्या इमारतीला आग लागली होती. १३ मे २०२२ ला ही भीषण आगीची घटना घडली होती. या इमारतीत राऊटर्स आणि सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपन्यांचं ऑफिस होतं. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने आग लागल्यावर लोक अडकून पडले होते. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक होरपळून जखमी झाले.

अलीपूरच्या पेंट कारखान्याला आग

२०२४ मध्ये उत्तर दिल्लीतल्या पेंट कारखान्याला आग लागली. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. ही आग इतकी भीषण होती की इतर दुकानांमध्येही ती पसरली. या घटनेत १२ लोक होरपळून जखमी झाले.

२०२३ मध्ये दिल्लीतल्या कोचिंग सेंटरला आग

दिल्लीतल्या मुखर्जी नगर भागात असलेल्या एका कोचिंग सेंटरला जून २०२३ मध्ये आग लागली होती. या घटनेत ६१ जण होरपळून जखमी झाले होते. वीजेच्या मीटरला आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण इमारतीत ही आग पसरली. या कोचिंग सेंटरमध्ये तेव्हा २०० ते २५० विद्यार्थी होते. जीव वाचवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकली. कुणी दोरीच्या आधारे खाली उतरलं, कुणी शिड्यांवरुन खाली आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

२५ मे २०२४ ला बेबी केअर न्यूबॉर्न हॉस्पिटलला आग

२५ मे २०२४ ला विवेक विहार या ठिकाणी असलेल्या बेबी केअर न्यूबॉर्न रुग्णालयाला आग लागली होती. रुग्णालयात नियमबाह्य पद्धतीने ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजन सिलिंडर्सचा स्फोट झाला आणि ही आग लागली होती. या घटनेत सात नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळेही दिल्ली हादरली होती.