Delhi Malviya Nagar hotel fire: गेल्या आठवड्यात दिल्लीत मालवीय नगर येथे हॉटेलला लागलेल्या आगीत २२ जणांचा दुर्दैवी अंत झाला. यात एकाच कुटुंबातील आठ सदस्यांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील आता अखेरच्या सदस्याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे कुटुंबप्रमुख राधे श्याम (८०) यांचा देखील मृत्यू झाला असून, आता कुटुंबातील कोणीही व्यक्ती हयात राहिलेली नाही. आगीत आठ जणांचा मृत्यू आणि आता कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण अग्रवाल कुटुंबच नाहीसे झाले आहे.

आठ जणांच्या मृत्यूची कल्पनाच नाही

८० वर्षीय राधे श्याम साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची काळजी घेण्यासाठी आणि हवं-नको ते पाहण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय बी&बी हॉटेलमध्ये शिफ्ट झाले होते. आगीच्या घटनेत अग्रवाल कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची कल्पना मात्र राधे श्याम यांना नव्हती. ते वारंवार कुटुंबियांची चौकशी करत होते. मालवीय नगरमधील हॉटेलमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. यात अग्रवाल कुटुंबातील आठ जणांचा समावेश होता. रुग्णालयाजवळच असणाऱ्या या आगीच्या घटनेची राधे श्याम यांना कल्पना नव्हती.

राधे श्याम यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबाचे हॉटेलमध्ये वास्तव्य

हॉटेलच्या आगीत विवेक अग्रवाल, लता आग्रवाल, तरजानी अग्रवाल त्यांच्या दोन मुली जिविशा आणि वार्या तसेच तीन इतर नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. राधे श्याम यांची देखभाल करण्यासाठी कुटुंबीय बी&बी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. दिल्लीतील वाहतूक कोंडी, रुग्णालयाचे अंतर आणि इतर बाबी विचारात घेऊन त्यांनी रुग्णालयाच्या जवळच असणाऱ्या या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रुग्णालयाकडून राधे श्याम यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीबाबत कुटुंबियांना कल्पना दिली होती. श्वसनाच्या समस्यवरुन त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त

विवेक अग्रवाल यांची मोठी मुलगी जिविशा बंगळुरुत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. आजोबाना पाहता यावे आणि अखेरच्या काळात् त्याच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून ती दिल्लीत आली होती. आजोबा राधे श्याम यांनी देखील नात बंगळुरुतून आल्याचे मोठ्या अभिमानाने रुग्णालयातील स्टाफला सांगितले होते. दरम्यान, कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याने गुरुग्राम सेक्टर ४६ येथील त्यांचे घर आता पूर्णपणे रिकामे झाले आहे. राधे श्याम यांच्यासह आता या कुटुंबातील सर्वच म्हणजे एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.