Delhi Malviya Nagar Hotel Fire Updates From Police FIR Copy: दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात बुधवारी सकाळी एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मधून आता अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे. ६ खोल्यांची परवानगी असताना तिथे तब्बल २८ खोल्या थाटण्यात आल्या होत्या, अशी माहिती उघड झाली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालवीय नगरमधील ‘फ्लरिश स्टेज्’ या हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली. या हॉटेलमध्ये सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते.
कुलूपबंद दरवाजा अन् गुदमरलेला श्वास!
हॉटेलच्या इमारतीमध्ये हवेच्या ये-जा करण्यासाठी (व्हेंटिलेशन) कोणतीही जागा ठेवण्यात आली नव्हती. सर्वात गंभीर बाब म्हणजे, आगीच्या वेळी तळघराचा (बेसमेंट) मुख्य दरवाजा पूर्णपणे कुलूपबंद होता. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. अखेर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बचावकार्य सुरू केले.

६ खोल्यांची परवानगी, पण उभारल्या २८ खोल्या!
या हॉटेलला केवळ ६ खोल्या चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मालकाने नियमांचे उल्लंघन करत तिथे तब्बल २८ खोल्या तयार केल्या होत्या. अग्निकांड घडले तेव्हा या २८ पैकी १८ ते १९ खोल्यांमध्ये पर्यटक मुक्कामासाठी थांबले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फॉरेन्सिक तपासणीत निष्काळजीपणा उघड
न्यायालयीन वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी घटनास्थळाची प्राथमिक पाहणी केली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
- हॉटेलमध्ये केवळ ३ ते ४ अग्निशामक नळकांडी (Fire Extinguishers) आढळून आली, पण ती एका जागेवरून हलवलीदेखील गेली नव्हती. म्हणजेच, आगीच्या वेळी त्यांचा वापरच केला गेला नाही.
- प्राथमिक तपासणीनुसार, बहुतांश मृतांचा मृत्यू आगीत होरपळून नाही, तर धुरामुळे गुदमरून झाला आहे. केवळ एका मृतदेहावर आगीत भाजल्याच्या जखमा आढळल्या आहेत.
- दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या नागरिकांची कागदपत्रे सुरक्षित आहेत.
- हे हॉटेल साकेत येथील मॅक्स रुग्णालयाच्या समोर असलेल्या ‘हौज रानी’ भागातील एका अत्यंत अरुंद गल्लीत होते. गल्ली लहान असल्यामुळे सुरुवातीला मदतकार्यातही अडथळे आले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी हॉटेलमध्ये काही लोक अडकल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला (PCR) आला होता. त्यानंतर स्थानिक ठाणे अंमलदार (SHO) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि अग्निशामक दलाने मिळून अनेकांना सुखरूप बाहेर काढले, मात्र तोपर्यंत २१ जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस आता हॉटेल मालकावर कडक कारवाईच्या तयारीत आहेत.
हॉटेल मालक लवकेश बजाजचा गुन्हेगारी इतिहास
दक्षिण दिल्लीतील ज्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ निष्पापांचा होरपळून मृत्यू झाला, त्या हॉटेलच्या मालकाबाबत आता एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या हॉटेलचा मालक लवकेश बजाज याला गेल्याच वर्षी दिल्ली पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्यात अटक केली होती, अशी माहिती उघड झाली आहे. बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट तयार करून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटमध्ये त्याचा थेट सहभाग होता.
