Delhi Malviya Nagar Hotel Fire: दिल्लीच्या मालवीय नगरमधील फ्लरिश बेड अँड ब्रेकफास्ट या हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये ११ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर ३५ जखमींपैकी १९ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. हॉटेलचा मालक लवकेश बजाजला पोलिसांनी अटक केली आहे. सदर हॉटेलला सहा खोल्या बांधण्याची परवानगी असताना बजाचने अनधिकृतपणे पाच मजल्यांवर २५ खोल्या बांधल्या होत्या. तसेच हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठीही एकच दार होते. पोलिसांनी बजाजची चौकशी केली असून त्यातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
गुरूवारी दिल्ली पोलिसांनी मालक लवकेश बजाजला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
२०२२ साली ६० वर्षीय लवकेश बजाज यांनी दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर येथील हौज राणी या छोट्याशा गल्लीतील तीन मजली इमारत विकत घेतली. या इमारतीचे ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेत रूपांतरित करण्याचा विचार त्यांनी केला. यानंतर त्यांनी इमारतीला फ्लरीश बी अँड बी असे नाव दिले. सहा खोल्यांची परवानगी असताना बजाजने पाच मजल्यांवर २५ खोल्या बांधल्या.

व्यवसायातील नफ्यासाठी जादा खोल्या बांधल्या
मात्र बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत हॉटेलमधील २१ निष्पापांचा बळी गेला. सायंकाळी बजाजला अटक करण्यात आले. अटकेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता बजाजने सांगितले की, या व्यवसायात चांगला नफा मिळत होता. आणखी नफा कमविण्यासाठी त्याने २५ खोल्या बांधल्या. तसेच या कृत्याचे समर्थन करताना त्याने म्हटले की, दिल्लीत सर्व काही चालते.
बजाजने पुढे म्हटले की, हॉटेलच्या दैनंदिन कामकाजावर त्याला देखरेख ठेवता येत नव्हती. त्यामुळे त्याने हॉटेलची व्यवस्था पाहण्यासाठी मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या प्रकरणात आता बजाजच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.
दिल्ली फायर सर्व्हिसेसने बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी म्हटले की, बजाजने हॉटेलच्या आत आणि बाहेर अनेक ठिकाणी लाकूड आणि प्लास्टिकचे बांधकाम केले होते. त्यामुळे आग आणखी भडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच गल्लीत बजाजच्या आणखी दोन मालमत्ता आहेत. त्याचीही आता तपासणी केली जात आहे.
आग पाहून मालक पळाला
बजाजच्या चौकशीतून आणखी बाबी समोर आल्या आहेत. वृत्तवाहिनीने पोलिसांमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, हॉटेलला आग लागली तेव्हा बजाज तिथे आला होता. मात्र जळते हॉटेल पाहून तो तिथून निघून गेला. लोकांना बाहेर काढण्यात मदत करण्याऐवजी भीतीपोटी बजाजने तिथून निघून जाणे पसंत केले.
पोलिसांनी बजाजवर सदोष मनुष्यवधासह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलचा मॅनेजर अद्याप फरार आहे. गुरूवारी दिल्ली पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी जळालेल्या हॉटेलला भेट देऊन घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला. तपासकर्त्यांनी स्थानिक रहिवासी, दुकानदार, कर्मचारी आणि इतर प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुग्राममधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (CA) विवेक अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीतील ‘मॅक्स हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी आले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.

गुरुग्रामच्या सेक्टर ४६ मध्ये राहणारे सीए विवेक अग्रवाल यांचे ८० वर्षीय वडील राधे श्याम अग्रवाल यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची विचारपूस करण्यासाठी विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी अग्रवाल, दोन मुलींसह इतर चार नातेवाईकांना घेऊन दिल्लीला आले होते. त्यांनी मालवीय नगरमधील ‘फ्लरिश स्टे’ या बेड-अँड-ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या.
बुधवारी सकाळी हे सर्वजण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते, त्याच वेळी अचानक हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत विवेक यांच्यासह कुटुंबातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता या कुटुंबात केवळ त्यांचे ८० वर्षांचे वृद्ध वडीलच जिवंत आहेत.

विदेशी तरुण थोडक्यात बचावला
फ्लरिश बेड अँड ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये गिनी देशातील बाह ट्रिमडिजिऊ हा तरुणही राहत होता. त्याचे वडील मॅक्स हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहेत. सोमवारी डिस्चार्ज घेऊन बाह ट्रिमडिजिऊ आणि त्याचे वडील बहसून हे हॉटेलवर परतणार होते. मात्र डॉक्टरांनी दोन-तीन दिवस रुग्णालयातच आराम करण्यास सांगितल्यामुळे बहसून रुग्णालयात होते.
तर बाह हा वडिलांबरोबर रात्रभर रुग्णालयात थांबून सकाळी हॉटेलवर आंघोळ आणि नाश्त्यासाठी येत असे. बुधवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे हॉटेलजवळ आला असता त्याला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले हॉटेल दिसले. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बाहने म्हटले की, आतमध्ये अनेक विदेशी नागरिक अडकले होते.
