Delhi Malviya Nagar restaurant fire: दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्तराँला लागलेल्या आगीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक नागरिक विदेशी असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत ४० जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीनंतर वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागिकांनी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या गाद्यांवर उड्या घेतल्या.
नागिरकांनी गाद्यांवर उड्या घेतल्या
मालवीय नगरमधील रेस्तराँला अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सर्वत्र धावाधाव सुरु केली. मिळेल त्या मार्गाने अडकून पडलेले नागरिक मार्ग काढत होते. वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाद्यांवर उड्या घेतल्या. दक्षिण दिल्लीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनंत मित्तल यांनी या घटनेबाबत एएनआयला माहिती दिली. “सकाळी आठ वाजून ४८ मिनिटांनी मालवीय नगरमधील फ्लोरिश स्टे बी&बी रेस्तराँला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती स्थानिक पोलिस आणि अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.”
पोलिसांनी काय सांगितले?
“घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवांनी बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. आठ अग्निबंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ४० जणांना सुखरुपपणे वाचविण्यात यश आले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याही घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत”, असे मित्तल म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी काय म्हणाले?
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दक्षिण-पूर्व यांच्यावतीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, “रेस्तराँला तळघरात कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सात ते आठ जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावरील गाद्यांवर उड्या घेतल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही”, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिली.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर
आगीच्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दोन लाख नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तर, आगीतील जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
