दिल्लीमधील रोहिणी भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्ज म्हणून घेतलेले पैसे मित्र परत करत नाही या रागातून ही हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मित्राची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह स्कुटरच्या पुढील भागात ठेवून मृतदेह निर्जनस्थळी नेऊन फेकून देण्यात आला. या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आऱोपी मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत असतानाची दृष्य कैद झाली आहेत.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : वर्गात बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून मित्रावर झाडल्या गोळ्या; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रेम नगर भागातील सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृष्यांमध्ये आरोपी आपल्या स्कुटरवर पायाजवळ एक पांढऱ्या गोणीमधून मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे. जवळजवळ १० ते १५ मिनिटांनी आरोपी एका मोकळ्या जागी थांबला आणि त्याने मृतदेह असणारी गोणी फेकून दिली. हा सर्व प्रकार या भागातील वेगवेगळ्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय.

रोहिणी विभागाचे पोलीस उपायुक्त पी. के. मिश्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार रक्ताने माखलेली गोण सापडल्याचा फोन पोलिसांना आला होता. “आम्हाला फोनवरुन रक्ताने माखलेल्या गोणीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहचलो. आम्ही मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी संजय गांधी रुग्णालयात पाठवला,” असं मिश्रा म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली असता या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी निळ्या रंगाच्या स्कुटरवरुन एक व्यक्ती मोठ्या आकाराची गोण घेऊन गल्यांमध्ये फिरत असल्याचे दिसले.

“रात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या आसपास एक व्यक्ती या परिसरात स्कुटरवरुन फिरत होती. या व्यक्तीच्या स्कुटरसमोरील पाय ठेवण्याच्या ठिकाणी एक मोठी गोण आडवी ठेवण्यात आल्याचे व्हिडीओत दिसून आलं. गोण घेऊ व्यक्ती कुठेतरी जात असल्याचे व्हिडीओत दिसलं. व्हिडीओतील गोण आणि मृतदेह सापडलेली गोण सारखीच असल्याचलक्षात आलं. आम्ही यासंदर्भात आमच्या खबऱ्यांना माहिती दिली आणि स्थानिकांकडे चौकशी केली असता स्कुटरवरील व्यक्तीचे नाव अंकित असल्याची माहिती आम्हाला मिळाली,” असंही मिश्रा यांनी सांगितलं.

काय घडलं?

पोलिसांनी अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार २४ वर्षीय अंकित उर्फ बिट्टू हा प्रेम नगरमधील रहिवाशी आहे. अंकितने त्याचा मित्र म्हणजेच रवीला (३४) कर्ज म्हणून ७७ हजार रुपये दिले होते. अंकित आणि रवी हे दोघेही एका स्थानिक टेलरच्या दुकानामध्ये काम करायचे. अंकितला नवीन मोटरसायकल घ्यायची असल्याने त्याने रवीकडे पैशांची मागणी केली. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अंकितकडून पैसे घेणाऱ्या रवीने अनेकदा विनंती करुनही पैसे परत केले नाही.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश: पाकिस्तानी महिलेची ग्रामपंचायत प्रमुखपदी निवड; वर्षभरानंतर प्रशासनाला आली जाग

आर्थिक अडचणींमुळे रवीला पैसे परत करता येत नव्हते. त्यामुळे अखेर अंकितने रवीला त्याच्या भाड्याच्या घरी पैशांसंदर्भात थोडं बोलायचं असल्याचं सांगून बोलवलं. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादादरम्यान रागाच्याभरात अंकितने रवीचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर अंकितने केबल वायरने रवीचा गळा आवळून त्याची हत्या केली. नंतर रवीचा मृतदेह सेलेटेप आणि केबलच्या मदतीने बांधून गोणीमध्ये ठेवला.  नंतर रात्रीच्या अंधारामध्ये घराबाहेर कोणी नसताना अंकितने मृतदेह असणारी गोण स्कुटरवर ठेऊन ती याच परिसरातील एका बंधाऱ्याजवळच्या मोकळ्या जागी टाकून दिली.

नक्की वाचा >> अभ्यासावरुन पालक ओरडल्याने १४ वर्षीय मुलाने घरातील दीड लाख चोरले अन् गोवा गाठले; क्लबमध्ये पैसे उडवले पैसे