जास्तीचे छोले मागितल्याच्या मुद्यावरून राजधानी दिल्लीत एका ३५वर्षीय गाडीचालकाचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. आऊटर दिल्लीतल्या निहार विहार भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जास्तीचे छोले मागितल्याच्या मुद्यावरून या गाडीचालकाला अनेकदा भोसकण्यात आलं. ज्वालापुरी नाला या ठिकाणी छोले भटोरोचं दुकान होतं. संदीप नावाचा गाडीचालक छोले भटोरे खाण्यासाठी आला होता. त्याने जास्तीचे छोले मागितले. यावरून वादाला तोंड फुटलं.
चिंटू गुप्ता या छोले भटोरे विक्रेत्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. वारंवार भोसकण्यात आल्यामुळे संदीपला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदीपचा मृत्यू झाल्याने चिंटू याच्यावर हत्येचा आरोपही निश्चित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
संदीपला २५ ऑक्टोबरला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला पंजाबी भाग इथल्या महाराजा अग्रसेन हॉस्पिटल इथे नेण्यात आलं. डॉक्टरांनी संदीपला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली मात्र ती अपुरी ठरली.
संदीपच्या पोटावर तीन वार करण्यात आले होते. त्याच्या कपाळावर आणि मनगटावरही खोल जखमा होत्या. संदीप या घटनेबद्दल सांगू शकेल अशा स्थितीत नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. जास्तीचे छोले मागण्यावरून चिंटू आणि संदीपमध्ये वादावादी झाल्याचं स्पष्ट झालं.
पश्चिम विहार पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘माझा मुलगा रविवारी मार्केटला गेला होता. त्याने जास्तीचे छोले मागितले. त्यानंतर वाद सुरू झाला. छोले भटोरे विक्रेत्याने संदीपला शिवीगाळही केली. वादावादीचं रुपांतर मारहाणीत झालं. संदीपला अनेकदा भोसकण्यात आलं आहे. मला फोन आला, आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. तिथे उपस्थित लोकांनी खूप मदत केली. पण आम्ही संदीपला वाचवू शकलो नाही’, असं त्याच्या बाबांनी सांगितलं.
‘माझ्या मुलाचा काय दोष होता? जास्तीचे छोले मागणे हा एवढा गुन्हा आहे का? छोल्यासाठी माझ्या मुलाचा जीव गेला’, असं संदीपचे वडील बिजेंदर सिंग यांनी सांगितलं. संदीप राव विहार इथे राहायचा. एका खासगी कंपनीसाठी गाडी चालवायचा. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. एक मुलगा १० तर दुसरा ४ वर्षांचा आहे.
‘संदीपवर ३ ते ४ जणांनी हल्ला केला पण आतापर्यंत फक्त छोलेविक्रेत्यालाच अटक करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय हवा आहे. संदीपवर हल्ला करणाऱ्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा व्हायला हवी’, असं संदीपच्या बाबांनी म्हटलं आहे.
