Delhi Crime Case : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. एकतर्फी प्रेमातून हत्या केली जातेय. शाहबाद येथील एक घटना नुकतीच उजेडात आली होती. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचून मारण्यात आलं होतं. दिल्लीतून आता आणखी एक तशीच घटना समोर आली असून. या प्रकरणात अमित नावाच्या व्यक्तीने त्याच्याच कार्यालयातील एका मैत्रीणीवर चाकूने सपासप वार केले आहेत. दिल्लीतील बेगमपूर परिसरात ही घटना घडली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत अमित आणि पीडित महिला एकत्र कामाला होते. अमितचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने तिच्यासमोर आपल्या प्रेमाचीही कबुली दिली होती. परंतु, तिने त्याचं प्रेम नाकारलं. तिने अनेकदा अमितच्या प्रेमाला नकार दिला होता. प्रेम नाकारल्याचा राग आल्याने शुक्रवारी (२ मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अमितने पीडितेवर चाकून सपासप वार केले. तिने आरडाओरडा केल्याने तिच्या मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. त्यामुळे अमित तिथून निसटला. पीडितेला स्थानिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




दरम्यान, अमितने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर तो त्याच्या कार्यालयात गेला. कार्यालयात गेल्यानंतर त्याने आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून आजूबाजू्च्या परिस्थितीचा शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या शाहबाद डेअरी भागात एका १६ वर्षीय मुलीचा निर्घृणपणे खून करण्यात आला. माथेफिरू आरोपी साहिल खान याने अल्पवयीन मुलीवर वीस वेळा धारदार शस्त्राने वार केले. एवढ्यावर न थांबता रस्त्यावर पडलेला सिमेंट ब्लॉक तिच्या डोक्यात घातला. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कुणीही आरोपीला रोखले नाही. दिल्ली पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथून अटक केली आहे.