वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीहून मँचेस्टरकडे जाणारे ‘इंडिगो’चे विमान आठ तासांच्या उड्डाणानंतर एरिट्रियाच्या हवाई क्षेत्रातून माघारी फिरावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, एरिट्रियातील हवाई वाहतूक नियंत्रण विभागाकडून ‘इंडिगो’ने घेतलेल्या उड्डाण परवान्याबाबत झालेल्या गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवली.

‘नॉर्स अटलांटिक एअरवेज’कडून भाड्याने घेतलेले ‘बोईंग ७८७’ विमानाचे रविवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच १२.३० वाजता दिल्लीतून उड्डाण झाले. ‘फ्लाइट रडार २४’या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या विमानाने युद्धाच्या पर्शियन आखाताचा परिसर टाळून इथिओपियामार्गे आफ्रिकेत प्रवेश केला. ते एरिट्रियाच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करत असताना अचानक वळण घेत ते दिल्लीकडे परतले. दुपारी २.३० वाजता हे विमान दिल्लीत उतरले.

‘इंडिगो’ने रविवारी युरोपकडील उड्डाणसेवा आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अंशत: सुरू केल्या होत्या. २६ फेब्रुवारीनंतरची मँचेस्टरसाठीची ही पहिलीच सेवा होती. युद्ध परिस्थितीचे हवाई क्षेत्र टाळण्यासाठी आफ्रिकेवरून लांबच्या मार्गाने उड्डाणे चालवली जात आहेत. यापूर्वी ‘इंडिगो’ची सर्व युरोपीय उड्डाणे स्थगित होती. ‘नॉर्स अटलांटिक एअरवेज’कडून भाड्याने घेतलेली ‘बोईंग ७८७-८’ विमाने युरोपीय युनियन सुरक्षा संस्थेच्या अधिकार क्षेत्रात येतात. या संस्थेने २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील ११ देशांच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करू नये, असा सल्ला दिला होता.