दिल्ली मेट्रोमध्ये महिला प्रवाशाने तिच्या परवानगीशिवाय फोटो काढल्याचा आरोप केल्यानंतर एका सीआयएसएफ जवानाने प्रवाशांशी वाद घालत सर्व्हिस पिस्तूल रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीआयएसएफने संबंधित जवानाला तत्काळ निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त न्यूज १८ने दिले आहे.
महिलेने फोटो काढल्याचा आरोप केल्यानंतर वाद
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे १२ वाजता मेट्रोच्या डब्यात हा प्रकार घडला. एका महिला प्रवाशाने सीआयएसएफ जवानावर तिचे फोटो तिच्या संमतीशिवाय काढल्याचा आरोप केला. महिलेच्या आरोपानंतर काही प्रवाशांनी जवानाला त्याचा मोबाइल फोन दाखवण्यास सांगितल्याचे सांगण्यात येते. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. प्रवाशांनी जवानाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने आपले सर्व्हिस पिस्तूल बाहेर काढून प्रवाशांच्या दिशेने रोखल्याचा आरोपही केला गेला आहे.
प्लॅटफॉर्मवरही पिस्तूल हातात असल्याचा आरोप
वाद वाढल्यानंतर जवान मेट्रोमधून उतरून प्लॅटफॉर्मवर गेला. मात्र, त्यावेळीही त्याच्या हातात पिस्तूल असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेदरम्यान काही सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र दुखापती कशा झाल्या याची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून, त्यामध्ये प्रवासी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
एम्स मेट्रो स्थानकावर पोलिसांना कॉल
दिल्ली मेट्रो पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेबाबत रात्री सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी पीसीआर कॉल आला होता. घटना एम्स मेट्रो स्थानकावर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र संबंधित महिलेने याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

सीआयएसएफने घेतली गंभीर दखल
सीआयएसएफ दिल्ली मेट्रोने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या प्रकरणाबाबत माहिती दिली. महिला प्रवाशाशी सीआयएसएफ कर्मचाऱ्याच्या कथित गैरवर्तनाची संघटनेने अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधित जवानाला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे सीआयएसएफने स्पष्ट केले.
