“पापा, मुझे बचालो…” दक्षिण दिल्लीतील एका पदपथावरून (फूटपाथ) झोपेत असतानाच अपहरण झालेल्या एका १० वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचे हे शेवटचे शब्द ठरले. पोटच्या मुलीचा तो आक्रोशाचा आवाज ऐकून वडिलांनी त्या पांढऱ्या कारच्या दिशेने जीवाच्या आकांताने धाव घेतली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. नराधम ड्रायव्हर चिमुरडीला घेऊन पसार झाला होता. त्यानंतर त्याने या मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
ती काळरात्र… आणि चिमुरडीचे अपहरण
सोमवारी रात्री दक्षिण दिल्लीतील एका फूटपाथवर ही चिमुरडी तिच्या आई-वडील आणि तीन भावंडांसह झोपली होती. त्याच वेळी तिथे एक ॲप-आधारित कॅब चालक आला. ‘बबलू’ असे या आरोपीचे नाव असून तो पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होता. तिथे तो प्रवाशाची वाट पाहत थांबला असताना, त्याची नजर फूटपाथवर झोपलेल्या या १० वर्षांच्या मुलीवर पडली. नशेत असलेल्या बबलूने त्या चिमुरडीला उचलले आणि जबरदस्तीने कारमध्ये टाकले. या झटापटीत मुलगी ओरडल्याने तिच्या वडिलांना जाग आली. त्यांनी तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग केला, पण वेगाने निघून गेलेल्या कारचा सुगावा त्यांना लागला नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून वडिलांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाशी (PCR) संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी पुढील चार तास संपूर्ण परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.
पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?
घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित कार अंधुक दिसत होती, तसेच तिचा नोंदणी क्रमांकही (नंबर प्लेट) स्पष्ट होत नव्हता. पोलिसांनी फुटेजची कसून तपासणी केली असता, ती पांढऱ्या रंगाची हॅचबॅक कार पहाटे ४ च्या सुमारास तिथे आली होती आणि तब्बल एक तास तिथेच उभी होती, असे दिसून आले. त्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास आरोपीने मुलीचे अपहरण केले.
- ॲप कंपन्यांकडून माहिती: पोलिसांनी या विशिष्ट भागात सक्रिय असलेल्या सर्व राईड-हेलिंग (कॅब) ॲप्सकडून त्या वेळेतील ट्रिपची माहिती मागवली.
- सीसीटीव्हीचे जाळे: त्या मार्गावरील इतर सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना कारचा अचूक क्रमांक मिळाला.
- जीपीएस आणि मोबाईल लोकेशन: कारमधील जीपीएस (GPS) आणि आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि पश्चिम दिल्लीतील विकासपुरी परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
जंगलात अत्याचार आणि हत्या
पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी बबलूने आपला गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. मुलीचे अपहरण केल्यानंतर त्याने कार गुरगाव-फरीदाबाद रस्त्याकडे नेली, जी घटनास्थळापासून साधारण २० किलोमीटर दूर होती. एका निर्जन ठिकाणी कार उभी करून त्याने मुलीला जंगलात ओढत नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर स्कार्फने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला.
नराधमाची भयंकर मानसिकता….गुन्हा करून पुन्हा ‘कामावर’!
या नराधमाची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही. निष्पाप मुलीचा जीव घेतल्यावर बबलूच्या चेहऱ्यावर ना कोणती भीती होती, ना पश्चात्ताप. बिहारचा मूळ रहिवासी असलेल्या बबलूने हत्या केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपली ड्युटी सुरू केली. त्याने गुरगावमधून एक प्रवासी गाडीत बसवला आणि त्याला पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे सोडले. तिथूनच पोलिसांनी त्याला सकाळी अटक केली.
“गुन्हा केल्यानंतरही त्याने प्रवाशाची ने-आण केली. त्याच्या वागण्यात कोणताही संशयास्पद बदल जाणवत नव्हता, जणू काही झालंच नाही अशा थाटात तो वावरत होता,” अशी माहिती ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेने पोलीस सूत्रांच्या आधाराने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बबलूवर आधीच बिहारमध्ये मारामारी आणि हल्ल्याचे ५ गुन्हे दाखल आहेत. बिहारमध्ये त्याला पत्नी आणि मुलेही आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बबलूला अवघ्या चार तासांत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस चकमकीत आरोपी जखमी
मंगळवारी पोलिसांनी जेव्हा गुन्ह्याचा पंचनामा आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी बबलूला नेले, तेव्हा त्याने पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या पोलीस चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागली असून तो जखमी झाला आहे.
ॲप कंपन्यांना नोटीस बजावणार
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला ड्रायव्हर म्हणून कामावर कसे ठेवले? याबाबत पोलीस आता संबंधित ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असून त्यांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.
