दिल्लीच्या उत्तरेकडच्या भागात १६ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह इतका कुजला होता की सुरुवातीला तो महिलेचा आहे की पुरुषाचा, हेही स्पष्टपणे ओळखता आले नव्हते. या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

१२-१३ सप्टेंबरच्या रात्री शेतात सापडला मृतदेह

१२ आणि १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री उत्तर-पश्चिम दिल्लीतील स्वरूप नगर परिसरातील कुशक रोडवरील जयपाल राणा यांच्या शेताजवळ एका मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ले होते. तसेच तिचा एक हात शरीरापासून वेगळा झालेला सापडला. मृतदेह कुजल्यामुळे सुरुवातीला ओळख पटवणेही कठीण झाले.

१० सप्टेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबरच्या रात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलगी तिच्या १७ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली होती. त्याने आपल्या तीन मित्रांना बोलावले. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर चौघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपींनी तिच्यावर चाकूने वार करून हत्या केली आणि मृतदेह झुडपांजवळ टाकून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

कुटुंबीयांकडून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारच नाही

पोलिसांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली नव्हती. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी ती अनेकदा घरातून बाहेर जात असे आणि काही दिवसांनी परत येत असे, अशी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तातडीने ती बेपत्ता असल्याची तक्रार केली नव्हती.

५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले

पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता आणि त्यामुळे सुरुवातीला आरोपींची ओळख पटवणे कठीण होते. मात्र, ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फूटेज तपासल्यानंतर त्यांना गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ एक टेम्पो जाताना दिसला. पोलिसांनी टेम्पोच्या मालकाशी संपर्क साधला. त्या रात्री टेम्पो त्याच्या एका मित्राने नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

चौघे ताब्यात

१५ आणि १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. संशयित टेम्पोचा शोध घेऊन त्याच्या चालकाची ओळख पटवण्यात आली आणि त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याशी संबंधित चार जणांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली. ताब्यात घेतलेल्या चौघांपैकी दोघे १७ वर्षांचे, एक १६ वर्षांचा आणि एक १९ वर्षांचा आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन चाकू जप्त केल्याचेही सांगितले आहे.

पॉक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा

प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८(ए), ६५(१) आणि ३(५) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) हे हत्येशी संबंधित आहे, तर कलम २३८ पुरावे नष्ट करणे किंवा आरोपीला वाचवण्यासाठी खोटी माहिती देण्याशी संबंधित आहे. कलम ३(५) अनेक व्यक्तींनी समान हेतूने केलेल्या कृत्याशी आहे. पॉक्सो कायद्याचे कलम ६ हे अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली? प्रत्येक ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची भूमिका काय होती? आणि आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी आहे का? याचा तपास सुरू आहे.