Delhi Minor Rape And Murder Case: दिल्लीतील दयालपूर भागात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुलीचा शेजारी असून, या घटनेनंतर तो फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना एक सूटकेस हालताना दिसली. सूटकेस उघडल्यानंतर त्यामध्ये त्यांची मुलगी असल्याचे त्यांना आढळले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
स्थानिक सरकारी शाळेत पाचवीत शिकणाऱ्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शनिवारी (७ जून) संध्याकाळी ७ वाजता जवळच राहणाऱ्या एका नातेवाईकाला बर्फ देण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
“मुलीचा सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर माझ्या १३ वर्षांच्या भाचीने मला सांगितले की, शेजारच्या एका महिलेने माझी मुलगी सहा मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीकडे चाव्या देण्यासाठी जाताना पाहिली होती,” असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.
मुलीचे वडील जेव्हा त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा त्यांनी एका घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना जमिनीवर एक सूटकेस पडलेली आढळली. ती सूटकेस हालत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ती उघडली असता, त्यामध्ये त्यांची मुलगी आढळली.
यावेळी मुलीच्या ओठांवर आणि चेहऱ्यावर जखमांचे स्पष्ट खुणा होत्या. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मी ती सूटकेस उघडली असता…
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या भयानक घटनेचे वर्णन करताना, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, “मी तिथे गेलो तेव्हा दरवाजा बंद होता. जेव्हा मी कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा मला एक सूटकेस हलत असल्याचे आढळले. मी ती सूटकेस उघडली असता त्यामध्ये मला माझी मुलगी आढळली. त्यानंतरम मी तिला जवळच्या एका नर्सिंग होममध्ये नेले. त्यांनी मला तिला मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.”