Delhi Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजस्थानमधील बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबाच्या कारने रस्त्यावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र, कारमध्ये अडकलेल्या आठ वर्षांच्या मुलाला आणि एक वर्षाच्या मुलीला वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. याबद्दल सविस्तर वृत्त दी आणिण एक्सप्रेसने दिले आहे.
ही घटना गुरुग्राममधील सोहना परिसरात धुनेला गावाजवळ पहाटे सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. बिहारमधील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब दिल्लीतील राजोकरी परिसरात राहत होते. बुम प्रसाद (३८), त्यांची पत्नी रूपा (३५) आणि त्यांची तीन मुले मारुती स्विफ्ट कारमधून राजस्थानमधील दौसा येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
बंद पडलेल्या बसला कारची जोरदार धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसवेवरील एलिव्हेटेड कॉरिडॉरवर एक खासगी बस बंद पडली होती. सोहना एलिव्हेटेड रोडच्या जंक्शनच्या आधीच चालकाने बस सोडून दिली होती. याच बसला बुम प्रसाद यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार बसखाली घुसली. त्यामुळे कारचा पुढील भाग आणि प्रवासी बसण्याचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच काही वाहनचालकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. गुरुग्राम पोलिसांचे आपत्कालीन प्रतिसाद पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बसखाली अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.
तासभर मुलाशी संवाद साधत बचावकार्य
कारच्या चक्काचूर झालेल्या भागात आठ वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी जिवंत असल्याचे बचाव पथकाच्या लक्षात आले. मुलगा शुद्धीवर राहावा यासाठी बचाव कर्मचारी जवळपास तासभर त्याच्याशी संवाद साधत होते. त्यानंतर दोन्ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दोघांनाही रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. दुसरीकडे, बुम प्रसाद, त्यांची पत्नी रूपा आणि सात वर्षांच्या मुलीला कारमधून बाहेर काढून सोहना येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
बसचालक आणि मालकाचा शोध सुरू
भोंडसी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सतपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्याच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रस्त्यावर बस सोडून गेलेल्या चालकाचा आणि बसमालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत.
